'शरद पवारांच्या मनात कुणी CM पदाचा उमेदवार असेल तर...' ठाकरेंनी आव्हाडांचे नाव घेत स्पष्टच सांगितलं...

Uddhav Thackeray to Sharad Pawar: मुख्यमंत्री पदावरुन महाविकास आघाडीत अलबेल नसल्याचे वृत्त समोर आले होते.यावरदेखील उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले.

Pravin Dabholkar | Updated: Nov 16, 2024, 03:44 PM IST
'शरद पवारांच्या मनात कुणी CM पदाचा उमेदवार असेल तर...' ठाकरेंनी आव्हाडांचे नाव घेत स्पष्टच सांगितलं... title=
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray to Sharad Pawar: विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी संपायला काही काळ राहिलाय. महाराष्ट्रात विधानसभेत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा संग्राम पाहायला मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी झी 24 तासला विशेष मुलाखत दिली. यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधला. तसेच मुख्यमंत्री पदावरदेखील भाष्य केले. मुख्यमंत्री पदावरुन महाविकास आघाडीत अलबेल नसल्याचे वृत्त समोर आले होते.यावरदेखील उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले.

तरी भाजपसोबत का होतात?

ठाकरेंकडून भाजपवर सडकून टिका केली जाते. पण दोघेही महाराष्ट्राच्या सत्तेत एकत्र होते. यावर ठाकरेंना प्रश्न विचारण्यात आल्यावर त्यांनी स्पष्ट शब्दात उत्तर दिले. मी सोबत होतो तेव्हा त्यांची लुटालूट होत नव्हती. आता ते ओरबाडून खायला चाललेयत. आता देशाच्या राजधानीला ते संपवायला निघालेत. 2014-2019 पासून जेव्हा नेतृत्व बदललं, तेव्हापासून आमचा विरोध सुरु झाला. त्यांच्या लुटीत त्यांना उद्धव ठाकरे अडथळा वाटत होता, असे ते म्हणाले.शिवसेना स्थापनेवेळचा मुद्दा पुन्हा भाषणात आहे. कारण मोदी-शहांमुळे गुजरात आणि इतर देशांमध्ये भिंत बांधली गेलीय. गुजरात देशाचा एक भाग आहे. पण यांनी गुजरातला वेगळं केलंय. माझ्या महाराष्ट्रात येणारे उद्योग गुजरातला नेले. इथल्या गुजरातींनाही तो रोजगार मिळेल. त्यांचीही रोजीरोटीही त्यांनी नेली. मी महाराष्ट्रातला उद्योग गुजरातला नेऊ देत नव्हतो. महाराष्ट्र ओरबाडण्यासाठी त्यांनी माझं सरकार पाडल्याचा आरोप त्यांनी केला. मी मुख्यमंत्री असताना कटेंगे-बटेंगे नव्हते. त्यांची सत्ता जिथे होती तिथेच लुटेंगे बाटेंगे आहे. आणि हीच त्यांच्या पक्षाची भूमिका. भाजप हा संकरित पक्ष आहे. माझं सरकार होतं तेव्हा हिंदू कुठे कापला गेला? मोदींच्या राज्यात असं होत असेल तर मोदी अकार्यक्षम आहेत. 10 वर्षे होऊनदेखील त्यांना हे वाटत असेल तर त्यांनी पद सोडलं पाहिजे, असे ठाकरे म्हणाले.

'आमदार जाणार हे माहिती होतं'

मी मुख्यमंत्री होतो तेव्हा मला अनेक गोष्टी माहिती होत्या. कोण कपडे बदलून जात होतं, त्यांची माहिती मला होती. पण या गद्दारांना मला जाण्यापासून अडवायचे नव्हते. म्हणून त्यांना जाऊ दिलं. मी मुख्यमंत्री म्हणून त्यांना अडवू शकलो असतो, असे ठाकरे यावेळी म्हणाले. 

ठाकरेंचे शरद पवारांना आवाहन 

उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून जाहीर करावे, अशी मागणी ठाकरे यांच्या शिवसेनेकडून होत होती. पण याला महाविकास आघाडीतून विरोध झाला. विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर केला जाईल, असे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सांगितले. दरम्यान ज्यांचे जास्त उमेदवार त्यांचा मुख्यमंत्री, असे सुत्र शरद पवारांनी सांगितले. यावर उद्धव ठाकरे यांना मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला.  पवार साहेब जितेंद्र आव्हाडांना मुख्यमंत्री करु इच्छित असेल तरी मला काही आक्षेप नाही. त्यांना त्यांच्या कोणत्या नेत्याला मुख्यमंत्री करायचे असेल तरी त्यांनी करावे. केवळ महाराष्ट्रद्रोही मुख्यमंत्री नको.शरद पवारांच्या मनात कुणी सीएमपदाचा उमेदवार असेल तर त्यांनी जाहीर करावा, असे आवाहन त्यांनी शरद पवार यांना केले.

गेलेल्या आमदारांना पुन्हा परत घेणार?

पुन्हा पदरात घ्या असे काही फुटलेल्या आमदारचे मत होते. पण ज्यांचे दर ठरलेयत त्यांना मला घ्यायचे नाही. आता नवे चेहरे उभे राहिले आहेत. मशाल हे चिन्ह आताच्या काळात योग्य चिन्ह आहे. पवार साहेब जितेंद्र आव्हाडांना मुख्यमंत्री करु इच्छित असेल तरी मला काही आक्षेप नाही. केवळ महाराष्ट्रद्रोही मुख्यमंत्री नको. सोयाबीन, कांदा, महिला सुरक्षितता, शिक्षण, मोफत एसटी प्रवास, रेल्वे प्रवास असे मुद्दे निवडणुकीत असायला हवेत. मुख्यमंत्री म्हणतात, आमचा जाहीरनामा चोरलाय. त्यांनी माझा पक्ष चोरलाय मी त्याचा जाहीरनामा काय चोरु? असा टोला त्यांनी लगावला.