गोव्यात राजकीय भूकंप होणार - संजय राऊत

 महाराष्ट्रापाठोपाठ आता गोव्यातही राजकीय भूकंप होणार, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.  

Updated: Nov 29, 2019, 11:30 AM IST
गोव्यात राजकीय भूकंप होणार - संजय राऊत title=
Pic Courtesy: ANI

मुंबई : महाराष्ट्रापाठोपाठ आता गोव्यातही राजकीय भूकंप होणार असं संजय राऊत यांनी म्हटले आहे. गोवा फॉरवर्ड पक्षाचे आमदार विजय सरदेसाई, आमदार विनोद पालयेकर, आमदार जयेश साळगावकर आणि गोआ फॉरवर्डचे उपाध्यक्ष दुर्गास कामत यांनी आज संजय राऊत यांची भेट घेतली. शिवसेनेने आता मिशन गोवा हाती घेतले आहे. 

गोव्यात भाजप सरकारसोबत असलेले आमदार आपल्या संपर्कात आहेत. विजय सरदेसाई आपल्या चार आमदारांसह आपल्या संपर्कात आहेत. सुदीन ढवळीकरांशीही आपली चर्चा झाली, असे राऊत यांनी म्हटले आहे. अनैतिक पायावर उभ्या असलेल्या गोवा सरकारमध्ये लवकरच भूकंप होईल, असे राऊत यांनी म्हटले आहे. त्यामुळे शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस भाजपला दे धक्का देण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहेत. तसे संकेत संजय राऊत यांनी दिले आहे.

काय म्हणालेत संजय राऊत?

गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष आणि गोव्याचे माजी उप-उपमुख्यमंत्री विजयी सरदेसाई यांच्यासह  तीन आमदार शिवसेनेशी युती करणार आहेत.  महाराष्ट्रात जसे घडले तसे एक नवीन राजकीय आघाडी गोव्यात आकार घेऊ लागली आहे. लवकरच गोव्यातही आपल्याला मोठा चमत्कार दिसून येईल, असे शिवसेना नेते संजय राऊत म्हणालेत.