अहमदाबाद : गुजरातमधील बनासकांठामधील अंबाजी जवळ एका दरीत भाविकांची बस कोसळ्याने मोठा अपघात झाला. या बसमधील २१ प्रवाशांचा मृत्यू झाला तर ३९ जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. बसमध्ये ६० पेक्षा जास्त प्रवासी असल्याची माहिती आहे. बसमधील सर्व प्रवाशी हे आणंदचे रहिवाशी आहेत. दरम्यान, या अपघाताबाबत तीव्र दु:ख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले आहे.
अंबाजी मंदिराला भेट दिल्यानंतर दर्शन करून परत येताना बसला हा अपघात झाला. त्रिशुलिया घाटाजवळ मुसळधार पावसामुळे बस घसरली आणि पलटी झाली. या अपघातात २१ लोक ठार झालेत. यात १४ पुरुष, तीन महिला आणि चार मुलांचा समावेश आहे. या अपघातात ३९ हून अधिक लोक जखमी झाले आहेत.
हा अपघात नेमका कशामुळे झाला याची अद्याप माहिती समोर आली नाही. दरम्यान, या ठिकाणी जोरदार पाऊस पडत असल्याने अपघातग्रस्त बसमध्ये अडकलेल्या भाविकांना बाहेर काढण्यात समस्या निर्माण झाली आहे. बसमधील मृत्यूमुखी पडलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी क्रेन बोलविण्यात आली आहे. अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून दुःख व्यक्त केले आहे
Devastating news from Banaskantha. I am extremely pained by the loss of lives due to an accident. In this hour of grief, my thoughts are with the bereaved families.
The local administration is providing all possible help to the injured. May they recover soon.
— Narendra Modi (@narendramodi) September 30, 2019
अंबाजी त्रिशुलिया घाटाजवळ ही बस कोसळल्याची माहिती समजताच पोलीस आणि प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मृत्युमुखी पडलेल्या सर्वांची ओळख पटवणे अद्याप बाकी आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.