अहमदाबाद : गुजरातमध्ये भाजपाचे ३ सत्ताधारी आमदार पक्ष नेतृत्वावर नाराज आहेत. या आमदारांनी नाराजीचा दावा करताना, आणखी एक धक्का दिला आहे. या आमदारांनी आणखी २० सत्ताधारी भाजपाचे आमदार नाराज असल्याचा दावा केला आहे. भाजपाच्या या ३ आमदारांनी बुधवारी अहमदाबादमध्ये पत्रकार परिषद घेऊन आपली नाराजी व्यक्त केली. पत्रकार परिषद घेण्याआधी नाराज आमदार मधू श्रीवास्तव, सावलीचे आमदार केतन इमानदार आणि मांजलपूर येथील आमदार योगेश पटेल यांनी बैठकीत एकमेकांशी चर्चा केली.
आमदारांचं हे बंड भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी मोठा धक्का असल्याचं म्हटलं जात आहे. हे बंड पीएम मोदी किंवा अमित शाह यांच्याविरोधात नसून, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांच्याविरोधात असल्याचं म्हटलं जात आहे.
या आमदारांनी नाराजी व्यक्त करत, दावा केला आहे की, आम्हाला राज्याच्या नेतृत्वाकडून दुर्लक्षित केलं जातंय. महत्व दिलं जात नाही, अधिकाऱ्यांची देखील भेट आम्हाला लवकर दिली जात नाही, जनतेशी संबंधित मुद्यावर अधिकारी देखील काही उत्तरं देत नाहीत, असे आरोप या नाराज आमदारांनी पत्रकार परिषदेत केले. आमदार केतन इमानदार यांनी म्हटलंय आम्ही पक्ष किंवा मंत्र्यांवर नाही तर अधिकाऱ्यांवर नाराज आहोत. राज्याचे मुख्यमंत्री रूपाणी परदेश दौऱ्यावर असताना या आमदारांनी बंडाचा पावित्रा घेतल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.