भाजप कार्यकर्ता असलेल्या जडेजानेच CSK ला जिंकवलं; नेत्याची अजब गुगली

IPL 2023 CSK vs GT Final: आयपीएल 2023 च्या अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने गुजरात टायटन्सचा 5 विकेट्सने पराभव केला. या विजयासह चेन्नईने आयपीएलचे पाचवे विजेतेपद पटकावले आहे. मात्र भाजप नेत्याच्या एका दाव्याने खळबळ उडाली आहे.

आकाश नेटके | Updated: May 31, 2023, 03:04 PM IST
भाजप कार्यकर्ता असलेल्या जडेजानेच CSK ला जिंकवलं; नेत्याची अजब गुगली title=

IPL 2023 : चेन्नई सुपर किंग्जने सोमवारी (29 मे) गुजरात टायटन्सचा पराभव करून पाचव्यांदा आयपीएल ट्रॉफीवर कब्जा केला. आयपीएल 2023 च्या अंतिम सामन्यात चेन्नईने (CSK) गुजरात टायटन्सचा (GT) 5 गडी राखून पराभव केला. चेन्नईच्या विजयात महेंद्रसिंग धोनीच्या कर्णधारपदासोबतच खेळाडूंची कामगिरीही महत्त्वाची ठरली. चेन्नईला शेवटच्या दोन चेंडूत 10 धावा हव्या होत्या. त्यावेळी रवींद्र जडेजाने पाचव्या चेंडूवर षटकार आणि शेवटच्या चेंडूवर चौकार मारून विजयावर शिक्कामोर्तब केले. चेन्नईच्या विजयानंतर धोनीने आनंदाने रवींद्र जडेजाला उचलून घेतले.

या विजयानंतर चेन्नईच्या संघावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. अशातच तमिळनाडू भाजपचे अध्यक्ष के. अन्नामलाई (K. Annamalai) यांनी असं काही वक्तव्य केलंय चेन्नईच्या विजयाचा भाजपसोबत संबंध जोडला आहे. अन्नामलाई यांच्या म्हणण्यानुसार, चेन्नई सुपर किंग्सने अंतिम सामना जिंकला कारण त्यात भाजपचा एक कार्यकर्ता खेळत होता. याच कार्यकर्त्यामुळे चेन्नईने गुजरात टायटन्सचा पराभव केला. अन्नामलाई यांनी तामिळनाडूतील एका वृत्तवाहिनीशी बोलताना ही माहिती दिली. चेन्नईच्या संघाचे अभिनंदन करताना अन्नामलाई म्हणाले की, भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा हा भाजपचा कार्यकर्ता आहे.

"भाजपच्या एका कार्यकर्त्याने एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील संघासाठी विजयी धावा केल्या. रवींद्र जडेजा हा भाजपचा कार्यकर्ता असून तो मूळचा गुजरातचा आहे. त्यांच्या पत्नी भाजपच्या आमदार आहेत. एका भाजप कार्यकर्त्याने चेन्नईसाठी विजयी खेळी केली आणि याचा आम्हाला अभिमान आहे," असे के. अन्नामलाई यांनी म्हटलं आहे.

"मला तमिळ असल्याचा अभिमान आहे. गुजरातच्या संघामध्ये चेन्नईपेक्षा जास्त तमिळ खेळाडू होते आणि मी त्यांच्यासाठीही आनंद व्यक्त करेन. एका तामिळ खेळाडूने (साई सुदर्शन) 96 धावा केल्या, आम्हाला याचा आनंद आहे.  एकही तामिळ खेळाडू सीएसकेमध्ये खेळला नाही. पण एमएस धोनीमुळे आम्ही अजूनही सीएसकेसाठी जल्लोष करतो आहोत," असे के. अन्नामलाई म्हणाले.

दरम्यान, या रोमांचक सामन्यात गुजरात टायटन्सने प्रथम फलंदाजी करताना 214 धावा केल्या होत्या. यादरम्यान साई सुदर्शनने 47 चेंडूत 96 धावांची खेळी केली. चेन्नईकडून डेव्हॉन कॉनवेने 47 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. जडेजाने 6 चेंडूत नाबाद 15 धावा केल्या. शिवम दुबेने 21 चेंडूत नाबाद 32 धावा केल्या. रायुडूने 8 चेंडूत 19 धावांचे योगदान दिले. अजिंक्य रहाणेने 27 धावा केल्या होत्या.