पंचकुला हिंसाचार : ...त्या १७ शवांची अजून ओळखही पटलेली नाही!

बलात्कार प्रकरणात दोषी ठरलेला गुरमीत राम रहीमच्या समर्थकांनी घडवून आणलेल्या हिंसाचारात ३१ जणांनी आपला जीव गमावलाय... तर २५० हून अधिक जण जखमी आहेत. 

Updated: Aug 26, 2017, 01:18 PM IST
पंचकुला हिंसाचार : ...त्या १७ शवांची अजून ओळखही पटलेली नाही! title=

नवी दिल्ली : बलात्कार प्रकरणात दोषी ठरलेला गुरमीत राम रहीमच्या समर्थकांनी घडवून आणलेल्या हिंसाचारात ३१ जणांनी आपला जीव गमावलाय... तर २५० हून अधिक जण जखमी आहेत. 

जखमींना योग्य वेळेत उपचार मिळाल्यानं त्यांचा जीव वाचलाय. परंतु, काही जणांची प्रकृती पूर्णपणे ढासळल्यानं त्यांनी रुग्णालयात पोहचण्यापूर्वीच जीव सोडला. मृतांपैंकी १७ जणांची ओळख अद्याप पटलेली नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांशीही संपर्क होऊ शकलेला नाही... त्यामुळे हे मृत कोण आहेत? असा प्रश्न सुरक्षा यंत्रणंना पडलाय. 

हे १७ शव सध्या मॉर्च्युरीमध्ये आपल्या कुटुंबीयांची वाट पाहतायत. यामध्ये दोन महिलांचे शव आहेत. मृतांत सर्वात तरुण मुलाचं वय १५ आहे तर सर्वात वयस्कर व्यक्तीचं वय ६० च्या आसपास असल्याचं सांगण्यात येतंय. त्यांचीही ओळख अद्याप पटलेली नाही. 

या शवांच्या कपड्यांमध्ये त्यांचं कोणतंही ओळखपत्र आढळलेलं नाही. त्यामुळे त्यांची ओळख पटवणं हे पोलिसांसाठी एक कोडचं बनलंय.

काही शवांजवळ सापडले मोबाईल

एका डॉक्टरनं दिलेल्या माहितीनुसार, मॉर्च्युरीमध्ये ठेवण्यात आलेल्या काही शवांजवळ मोबाईल आढळले... त्याच्यावर अनेक कॉलही येत होते. परंतु, पोलिसांनी मात्र हे कॉल रिसिव्ह न करण्याचा सल्ला डॉक्टरांना दिला.

दंगा करणाऱ्या लोकांचं लक्ष हॉस्पीटलकडे जाऊ नये यासाठी ही खबरदारी पोलिसांनी घेतली होती. शनिवारपासून या मोबाईलवर येणारे कॉल घेऊन या मृतांच्या नातेवाईकांना माहिती देण्यात येईल, असं पोलिसांनी स्पष्ट केलंय.