देशात ओमायक्रॉन आणि कोरोनाचे किती रुग्ण? केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली महत्त्वाची माहिती

ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर आरोग्याच्या नियमांचं पालन करणं आवश्यक असल्याचं आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे

Updated: Dec 10, 2021, 07:04 PM IST
देशात ओमायक्रॉन आणि कोरोनाचे किती रुग्ण? केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली महत्त्वाची माहिती title=

नवी दिल्ली : देशात गेल्या 14 दिवसांत कोरोनाच्या दैनंदिन रुग्णांची संख्या 10 हजारांहून कमी आहे, तसंच देशातील एकूण सक्रिय रुग्णांपैकी ४३ टक्के रुग्ण हे एकट्या केरळमध्ये आहेत अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे. नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.

लव अग्रवाल यांनी देशातील कोरोनाच्या नवीन ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या स्थितीबद्दल देखील माहिती दिली. भारतात आतापर्यंत Omicron प्रकाराच्या संसर्गाची एकूण 25 प्रकरणं नोंदवली गेली आहेत. या सर्व रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे दिसून आली आहेत. 

सार्वजनिक आरोग्याच्या नियमांचं पालन करणं आवश्यक 
जागतिक आरोग्य संघटनेने (WHO)याबाबत सतर्क केलं असून लसीकरणानंतरही सार्वजनिक आरोग्याच्या नियमांचं सातत्यानं पालन केले पाहिजे, असं लव अग्रवाल यांनी म्हटलं आहे.  सार्वजनिक आरोग्याचे नियम शिथले केल्यास कोरोना संसर्गाची प्रकरणं वाढू शकतात असा इशाराही WHO ने दिला आहे.

पॉझिटिव्ह रेट जास्त असलेल्या ठिकाणी प्रतिबंध
ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर जागतिक परिस्थितीवर लक्ष ठेवलं जात असून बैठका घेतल्या जात असल्याचं ICMR चे महासंचालक बलराम भार्गव यांनी म्हटलं आहे. जेथे सकारात्मकता दर पाच टक्क्यांपेक्षा जास्त असेल तेथे जिल्हा स्तरावर निर्बंध लावले जावेत, असं भार्गव यांनी म्हटलं आहे.

संरक्षणासाठी लस आणि मास्क आवश्यक
निती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही.के. पॉल म्हणाले की,  मास्कचा वापर सातत्याने कमी होत आहे. लस आणि मास्क दोन्ही आवश्यक आहेत हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. जागतिक स्थितीतून आपण धडा घेतला पाहिजे, असे ते म्हणाले.

केंद्र सरकारकडून निरिक्षण आणि तपासणी
आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे निरीक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी काम केलं जात असल्याची माहितीही बलराम भार्गव यांनी दिली आहे.. राज्यांना बाहेरील देशातून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ओमायक्रॉन हा अधिक संसर्गजन्य व्हेरिएंट असल्याने खबरदारी घेण्यासही सांगण्यात आलं आहे.

59 देशांमध्ये 2936 ओमिक्रॉनची प्रकरणं
24 नोव्हेंबरपर्यंत केवळ दोन देशांमध्ये ओमायक्रॉनच्या संसर्गाची प्रकरणे नोंदवली गेली आहेत. आता तब्बल ५९ देशांमध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. ५९ देशात आतापर्यंत २९३६ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. याशिवाय ७८ हजार ५४ संभाव्य प्रकरणं समोर आली असून त्यांचं जीनोम सिक्वेसिंग केलं जात आहे.