एकतर्फी प्रेमातून युवकाचा हायव्होल्टेज ड्रामा, मुलीच्या नातेवाईकांना ठेवलं ओलीस

 मुलीला भेटण्यास विरोध केल्याने बंदुकीचा धाक दाखवत कुटुंबातील तिघांना या युवकानं तब्बल 6 तास एका खोलीस बंद करुन ठेवलं. 

Updated: Jun 16, 2021, 10:46 PM IST
एकतर्फी प्रेमातून युवकाचा हायव्होल्टेज ड्रामा, मुलीच्या नातेवाईकांना ठेवलं ओलीस

ओडिशा - एकतर्फी प्रेमातून एका युवकाने चक्क मुलीच्या नातेवाईकांनाच 6 तास ओलीस ठेवलं. मुलीला भेटण्यासाठी हा युवक मुलीच्या काकांच्या घरी गेला. यावेळी मुलीला भेटण्यास विरोध केल्याने बंदुकीचा धाक दाखवत कुटुंबातील तिघांना या युवकानं तब्बल 6 तास एका खोलीस बंद करुन ठेवलं. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि युवकाला ताब्यात घेतलं.

ओडिसातल्या बलांगीर इथं राहणाऱ्या या युवकाचं नाव विक्रम पांडा असं असून तो इथं एक इंटरनेट कॅफे चालवतो. तर मुलगी बलांगीर इथं असलेल्या मेडिकल कॉलेजमध्ये कामाला आहे. बलांगीर शहरापासून 15 किलोमीटर असलेल्या गावातून ती कॉलेजमध्ये रोज ये-जा करते. तर कधी बलांगीरपासून जवळच असलेल्या शांतिपाडा परिसरात ती आपल्या काकांकडे राहिला जाते. 

मंगळवारी सकाळी हा युवक देशी बंदूक घेऊन थेट मुलीच्या काकांच्या घरी पोहचला आणि मुलीला भेटण्याचा आग्रह करु लागला. कुटुंबातील लोकांनी या विरोध केला असता युवकानं बंदुकीचा धाक दाखवत काका, काकी आणि त्यांच्या मुलाला एक खोलीत बंद केलं. यानंतर आरडाओरडा करत त्यानं आत्महत्या करण्याची धमकीही दिली. तसंच बंदुकीतून तीन राऊंड फायर केले. यामुळे परिसरातही दहशत निर्माण झाली.

खोलीत बंद असलेल्या मुलीच्या नातेवाईकांनी मोबाईलवरुन पोलिसांना याबाबत माहिती दिली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत युवकाला समजवण्याचा प्रयत्न केला. पण युवक मुलीला भेटण्यावर अडून बसला होता. अखेर पोलिसांनी दरवाजा तोडत युवकाला ताब्यात घेतलं. या मुलानं बंदूक कुठून खरेदी केली याचाही पोलीस तपास करत आहेत.