Rain Update : हिमाचल प्रदेशात नद्यांना रौद्र रुप, एकच हाहाकार; उत्तराखंडमध्ये 'रेड अलर्ट'

Latest Rain Updates : महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात सध्या पावसानं जोर धरला आहे. देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये तर हा पाऊस धुमाकूळ घालताना दिसत आहे. पाहा कधी सुधारणार ही परिस्थिती....   

सायली पाटील | Updated: Jul 12, 2023, 07:09 AM IST
Rain Update : हिमाचल प्रदेशात नद्यांना रौद्र रुप, एकच हाहाकार;  उत्तराखंडमध्ये 'रेड अलर्ट' title=
Himachal floods continues on day 4 imd issued red alert for uttarakhand

Himachal Pradesh Uttarakhand Rain Alert: मागील तीन दिवसांपासून सुरु असणाऱ्या अती मुसळधार पावसामुळं हिमाचल प्रदेशातील नद्या रौद्र रुप धारण करून वाहू लागल्या. नद्यांची पात्र अचानक दुपटीनं वाढली आणि त्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. डोंगररांगांमधून हिमाचलच्या मैदानी भागात येणाऱ्या या नद्यांचा पाण्याचा वेग इतका होता की प्रवाहाच्या वाटेत येणाऱ्या मोठाल्या वृक्षांसोबतच टेकड्या, पूल, रस्ते, घरं सर्वकाही या नद्यांनी गिळंकृत केल्याचं पाहायला मिळालं. 

हिमाचलच्या काही भागांमध्ये पावसानं विश्रांती घेतली असली तरीही आता भूस्खलनाचा धोका वाढला आहे. राष्ट्रीय महामार्गापासून अंतर्गत भागांमध्ये अनेक ठिकाणी भूस्खलन झाल्यामुळं वाहतुकीचे सर्वच पर्याय ठप्प असल्याचं लक्षात येत आहे. मंडी येथे चंदीगढ- मनाली राष्ट्रीय महामार्गावरही भूस्खलन झाल्यामुळं हा मार्ग सध्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे.

हेसुद्धा वाचा : Maharashtra Rain Updates : विदर्भात 'यलो अलर्ट' तर कोकण- मुंबईत मुसळधार, पाहा पावसाची बातमी  

वाहतूक बंद, वीजपुरवठा खंडीत... सर्वत्र चिखल 

अधिकृत सूत्रांच्या माहितीनुसार हिमाचलमध्ये सध्याच्या घडीला साधारण 1239 रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत. तर, 3 राष्ट्रीय महामार्गांवरील वाहतूकही ठप्प आहे. राज्यात सध्या 2577 वीज ट्रान्सफॉर्मर बंद असून, 1418 ठिकाणांवरील पाणीपुरवठाही बंद आहे. पावसानं देशाच्या या पर्वतीय भागामध्ये हाहाकार माजवल्यामुळं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं असून, येथील शाळा, महाविद्यालयं आणि इतर आस्थापनंही बंद असल्याची माहिती मिळत आहे. 

चारधाम यात्रेवरही पावसाचे परिणाम 

उत्तराखंडमध्ये (Uttarakhand Rain Alert) सुरु असणाऱ्या पावसाच्या धर्तीवर हवामान विभागानं 'रेड अलर्ट' जारी करत धोक्याचा इशारा दिला आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यासोबतच पर्यटकांनाही राज्य शासनानं सुरक्षित स्थळी थांबण्याचं आवाहन केलं आहे. उत्तराखंडमध्ये कुमाऊंपासून गढवालपर्यंत भूस्खलनाच्या घटना घडल्यामुळं यादरम्यान येणारे अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेलण्यात आले आहेत. 

तिथं उत्तरकाशीमध्ये भूस्खलन सुरुच असल्यामुळं अनेक वाहनांचंही नुकसान झालं आहे. सुरुवातीला उत्तराखंडमध्ये लागू असणारा यलो आणि ऑरेंज अलर्ट येथील पर्जनन्यमान पाहता काही तासांनी रेड अलर्टमध्ये बदलण्यात आला. उत्तराखंडमध्ये सुरु असणाऱ्या या पावसाचे चारधाम यात्रेवरही थेट परिणाम झाले असून, काही ठिकाणांवर यात्रा ठप्प असल्याचं कळत आहे. 

तिथे यमुना नदीची पाणीपातळी वाढल्यामुळं दिल्ली- हरियाणासह पंजाबमध्ये गंभीर परिस्थिती पाहायला मिळत आहे. रेल्वे वाहतुकीवर याचे परिणाम झाले असून, काही लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांच्या वेळाही बदलण्यात आल्या आहेत. रेल्वे प्रशासनाकडून त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरून याबाबतची अधिकृत माहिती देण्यात येतेय.