Maharashtra Rain Updates : जूनच्या अखेरीस दमदार बरसणाऱ्या पावसानं जुलै महिन्यात महाराष्ट्रातील बहुतांश भाग व्यापला. राज्याच्या अनेक भागांमध्ये तो मुसळधार बरसू लागला. पण, मुंबईत मात्र पावसाची उघडीप सुरु झाली. मागील तीन ते चार दिवसांपासून शहरातील काही भागांमध्ये पावसाच्या सरींची ये-जा सुरु होती. तर काही भागांमध्ये लख्ख सूर्यप्रकाश आल्याचं पाहायला मिळालं. शहराचा काही भाग आणि उपनगरीय क्षेत्र मात्र याला अपवाद ठरलं. कारण, या भागांमध्ये पावसाची दमदार हजेरी पाहायला मिळाली. येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये हवामानाचा अंदाज वर्तवत IMD नं विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे.
हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार राज्यात बुधवार-गुरुवारपासून पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्याच धर्तीवर उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मुंबईतही गुरुवारपासून पाऊस जोर धरणार असून, ठाणे, रायगड, पालघर या भागांमध्ये ढगाळ वातारणासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोकणाचा बहुतांश भाग आता मान्सूननं व्यापला असून, इथं शेतीच्या कामांना वेग आला आगे. तर, घाटमाध्यावरील अनेक धबधबे प्रवाहित झाले आहेत. विदर्भाचही ओढेनाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. पण, धरण क्षेत्रांमध्ये मात्र पावसाची हजेरी फारशी समाधानकारक नसल्यामुळं पाणीसंकट काही टळलेलं नाही.
मागील काही तासांमध्ये पावसानं काहीशी विश्रांती घेतली असली तरीही पुढच्या 48 तासांमध्ये मात्र तो मुसळधार बरसणार आहे. त्यामुळं या पावसाळी दिवसांमध्ये घराबाहेर पडणार असाल तर, मात्र पावसाची खबरबात विचारात घेऊनच घराबाहेर पाय ठेवा.
महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढतानाच देशातही पावसानं दमदार हजेरी लावल्याचं स्पष्ट होत आहे. तिथं दक्षिण आणि पूर्वोत्तर भागांमध्ये पावसानं निसर्ग बहरला आहे. पण, हाच निसर्ग उत्तरेकडील राज्यांमध्ये मात्र रौद्र रूप दाखवत आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू काश्मीरचा काही भाग, पंजाब, हरियाणा या भागांना पावसानं झोडपलं असून, येथून वाहणाऱ्या नद्यांची पाणीपातळीही वाढली आहे. हिमाचलमध्ये बहुतांश नद्या धोक्याच्या पातळीच्याही वर वाहत असल्यामुळं राज्यात पूराचं थैमान पाहायला मिळत आहे.