दीड फुटांच्या बर्फानं ऍम्बुलन्सला रोखलं पण, यांच्या इच्छाशक्तीला कसं रोखणार...

स्थानिकांनी हरिचंद नेगी यांच्यासाठी दोन काठ्यांच्या सहाय्यानं स्ट्रेचर तयार केलं

Updated: Jan 12, 2020, 02:36 PM IST
दीड फुटांच्या बर्फानं ऍम्बुलन्सला रोखलं पण, यांच्या इच्छाशक्तीला कसं रोखणार...

सिमसौर, हिमाचल प्रदेश : बर्फवृष्टीनंतर तीन दिवसांनी हिमाचल प्रदेशात (Himachal Pradesh) लोकांना थोडा दिलासा मिळतोय. नुकताच राजगढ भागात एक गर्भवती महिलेला ९ किलोमीटरपर्यंत खांद्यावर उचलून रुग्णालयात पोहचवल्याची एक घटना समोर आली होती. आता असाच एक नवा व्हिडिओ समोर आला ज्यात एका व्यक्तीला काही लोक आपल्या खांद्यावर उचलून घेऊन जात असताना दिसत आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, हरिपूर धार क्षेत्रातील गेहल दिमाइना गावाचे रहिवासी हरिचंद नेगी यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का बसला होता. परंतु, या भागातील लिंक रोड बर्फवृष्टीमुळे बंद आहे. रस्त्यावर जवळपास दीड फुटांचा बर्फ साचलाय. त्यामुळे कोणतंही वाहन इथं पोहचू शकत नाही. इथं १०८ ऍम्बुलन्स किंवा इतर कोणतही वाहन पोहचू शकत नाही. 

अशा वेळी स्थानिकांनी हरिचंद नेगी यांच्यासाठी दोन काठ्यांच्या सहाय्यानं स्ट्रेचर तयार केलं... आणि त्याला चादर गुंडाळून नेगी यांना आपल्या खांद्यावरून पहिल्यांदा हरिपूरधार आणि नंतर शिमला इथल्या रुग्णालयात पोहचवण्यास मदत केली. 

हिमालयीन टेकड्यांवर बर्फवृष्टी ही तिथल्या फळांच्या झाडांसाठी वरदान ठरते. परंतु, जास्त दिवस वर्फवृष्टी झाली तर जनजीवन मात्र ठप्प होऊन जातं. चार दिवसांपेक्षा जास्त दिवस झालेली बर्फवृष्टी लोकांसाठी अग्निदिव्यापेक्षा कमी ठरत नाही.

इथे सध्या डोंगराळ भागातील रस्ते बर्फानं व्यापून टाकलेत. बीआरओ हे रस्ते खुले करण्याचा प्रयत्न करत आहे. जिल्ह्यातील नोहराधार, हरिपूरधार, चूडधार आणि संगडाह यासहीत अनेक ठिकाणचे लिंक रोड बंद पडलेत. 

त्यामुळे, आजारी व्यक्ती आणि गर्भवती महिलांना रुग्णालयात पोहचवणंदेखील कठिण होऊन बसलंय.