कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांचा राजीनामा, भावूक भाषणात स्वत:ला फायटर म्हटलं, नेमकी का आली ही परिस्थिती?

Justin Trudeau Resignation: कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी राजीनामा दिलाय. ट्रूडो यांच्या राजीनाम्यानंतर कॅनडात राजकीय अस्थिरता वाढण्याची चिन्हे आहेत. अल्पमतात आल्यावर त्यांनी लिबरल पक्षाचे नेतेपदही सोडलंय. 

नेहा चौधरी | Updated: Jan 6, 2025, 10:32 PM IST
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांचा राजीनामा, भावूक भाषणात स्वत:ला फायटर म्हटलं, नेमकी का आली ही परिस्थिती?  title=

Justin Trudeau Resignation: अखेर जे अपेक्षित होते तेच झाले. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांना त्यांच्या चुकीचे परिणाम भोगावे लागले. त्यांनी सोमवारी कॅनडाच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. अंतर्गत असंतोष आणि लिबरल पक्षातील लोकप्रियता कमी झाल्यामुळे जस्टिन ट्रुडो यांना हे पाऊल उचलावे लागले.

53 वर्षीय नेत्याने ओटावा येथे पत्रकार परिषदेत पत्रकारांना सांगितले की, “पक्षाच्या नवीन नेत्याची निवड झाल्यानंतर मी पक्षाचे नेते आणि पंतप्रधानपदाचा राजीनामा देण्याचा विचार करत आहे. याचा अर्थ नवीन नेत्याची निवड होईपर्यंत ट्रुडो कार्यवाहक पंतप्रधान म्हणून राहतील.

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो म्हणाले की, नवीन नेत्याची निवड होईपर्यंत देशाची संसद 24 मार्चपर्यंत तहकूब केली जाईल. 'कॅनडाच्या इतिहासातील सर्वात प्रदीर्घ अल्पसंख्याक संसदीय अधिवेशनानंतर, संसद काही महिन्यांपासून ठप्प आहे,' ते म्हणाले. ट्रम्प म्हणाले, 'आज सकाळी मी गव्हर्नर जनरलला सल्ला दिला की आम्हाला संसदेचे नवीन अधिवेशन हवे आहे. त्यांनी ही विनंती मान्य केली असून, आता सभागृह 24 मार्चपर्यंत तहकूब केले जाईल.'

जस्टिन ट्रुडो हे 2015 पासून कॅनडाचे पंतप्रधान होते. लिबरल पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी नेतृत्वाच्या मुद्द्यांवर निर्णय घेईल आणि त्याची बैठक या आठवड्यात होणार असल्याचे अहवालात म्हटलंय. 

लिबरल पक्षातील एका सूत्राने सांगितले की, पक्षाच्या घटनेत किमान चार महिन्यांची तरतूद असली तरी पुढील नेत्याचा निर्णय घेण्यासाठी किमान तीन महिने लागतील.