Maharashtra weather News : देशभरात सध्या उत्तरेपासून दक्षिणेपर्यंतच्या बहुतांश राज्यांमध्ये गारठा वाढत असून अरबी समुद्रातील कमी दाबाच्या प्रणालीचे होणारे कमीजास्त परिणाम वगळता गुजरातपासून मेघालयापर्यंत आणि काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत तापमानात काही अंशांची घट नोंदवली जात आहे. अर्थात काही भागांमध्ये मात्र सूर्य डोक्यावर आल्यानंतर तापमानवाढही नोंदवली जात आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये राज्यातील बहुतांश भागांमध्ये थंडीचा कडाका आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर भारतातील पर्वतीय क्षेत्रांमध्ये थंडीचा कडाका वाढत असला तरीही मैदानी भागांमध्ये मात्र किमान तापमानात 2 ते 3 अंशांची वाढ झाली आहे.
इथं महाराष्ट्रातील उत्तर क्षेत्र, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये थंडीचा कडाका वाढत असला तरीही कोकण किनारपट्टी क्षेत्रासह मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये दिवसा तापमानात वाढ झाल्याचं पाहायला मिळणार आहे. राज्यात गारठा धीम्या गतीनं वाढणार असून पुढील तीन दिवसांमध्ये तापमानाचा आकडा 3 ते 5 अंशांनी कमी होईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.