भोपाळ : भोपाळमध्ये लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं काँग्रेसचे दिग्विजय सिंह विरुद्ध भाजपाच्या प्रज्ञा सिंह अशी लढत रंगली आहे. या लढाईत आता साधूसंतांनी देखील उडी घेतली आहे. भोपाळमधल्या राजकीय लढतीला धार्मिक रंग आला आहे.
भोपाळच्या सोफिया महाविद्यालय मैदानात सध्या जणू कुंभमेळा भरला आहे. शेकडो साधूसंत हटयोगाच्या माध्यमातून इथं अघोरी कर्मकांड करत आहेत. भोपाळमधील भाजप उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह यांच्या विरोधात हे सगळे साधूसंत एकवटले आहेत. साध्वी प्रज्ञासिंह यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव व्हावा आणि काँग्रेस उमेदवार दिग्विजय सिंह यांचा विजय व्हावा, यासाठी हे हटयोगी साधना करत आहेत.
दिग्गीराजांच्या बाजूनं समर्थनार्थ प्रचारात उतरलेल्या या हटयोगी साधूंचं नेतृत्व कम्प्युटर बाबा करत आहेत. पुढचे काही दिवस हा यज्ञयाग सुरू राहणार असून, दिग्गीराजांच्या प्रचारासाठी ते रोड शो देखील करणार आहेत.
एकीकडं साधूसंतांनी साध्वींच्या विरोधात धर्मयुद्ध पुकारलं असताना, भाजपामधूनही साध्वी प्रज्ञासिंह यांना घरचा आहेर मिळतो आहे. शहीद हेमंत करकरे यांच्याविषयी साध्वी यांचं वक्तव्य चुकीचंच होतं, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.
एकीकडं साध्वींच्या उमेदवारीवरुन उठलेलं वादळ, त्यात साध्वींनी केलेली वादग्रस्त वक्तव्यं, निवडणूक आयोगानं त्यांना केलेली प्रचारबंदी आणि आता साधूसंतांनी साध्वींविरोधात घेतलेली भूमिका यामुळं भोपाळचा रणसंग्राम आणखीच रंगला आहे.