Amit Shah Speech In Lok Sabha On Manipur: मणिपूरमधील जातीय हिंसाचाराच्या मुद्द्यावरुन लोकसभेमध्ये नरेंद्र मोदी सरकारच्याविरोधातील अविश्वास ठरावाला बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विरोधी पक्षावर हल्लाबोल केला. यावेळेस अमित शाहांनी, "मी विरोधी पक्षाच्या या मुद्द्याशी सहमत आहे की तिथे हिंसाचार झाला आहे. हिंसेच्या घटना या लज्जास्पद आहेत. मात्र यावरुन राजकारण करणं हे अजून लज्जास्पद आहे," असं म्हणत विरोधकांना लक्ष्य केलं. 'तुम्ही राजकीय हेतूने हे सारं करत आहात,' असा टोलाही अमित शाहांनी लगावला.
गृहमंत्री अमित शाहांनी लोकसभेला संबोधित करताना, "देशात यांनीच असा भ्रम पसरवला आहे की सरकार मणिपूरवरील चर्चेसाठी तयार नाही. मात्र मी सांगू इच्छितो की अधिवेशाच्या तारखांची घोषणा झाली नव्हती तेव्हापासून आम्ही यावर चर्चा व्हायला हवी असं म्हणतोय. सरकारने मणिपूरसाठी काय केलं हे मी आज सांगू इच्छितो," असं म्हणत केंद्राने केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. "मणिपूरमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला. मणिपूरमध्ये भाजपा मागील 6 वर्षांपासून अधिक काळापासून सत्तेत आहे. या 6 वर्षांमध्येच मणिपूरमध्ये कधीच बंद झाला नाही. या राज्यात या 6 वर्षांमध्ये कधीच हिंसा झाली नाही," असं अमित शाह यांनी सांगितलं.
"2021 मध्ये शेजारच्या म्यानमार देशामध्ये सत्तांतर झालं त्यावेळेस तेथील लष्करी शासनाकडून कुकी लोकांवर अत्याचार होऊ लागला. म्यानमार आणि भारताच्या सीमेवर कोणतीही बंधने नसल्याने म्यानमारमधून हजारो कुकी लोक मणिपूर आणि मिझोरममध्ये आले आणि स्थायिक झाले. त्यामुळे लोकसंख्येमधील घटकांच्या टक्केवारीत बदल झाला. तिथे आपला करार असा आहे की तिकडून इथे येणाऱ्यांना पासपोर्ट लागत नाही. हे पाहून आम्ही 2022 मध्ये सीमेवर कुंपण घालण्यास सुरुवात केली. आम्ही जानेवारीमध्ये त्या ठिकाणी ओळखपत्र बनवण्यास सुरुवात केली. अंगठ्यांच्या ठशांच्या आधारे ओळख पटवण्यास सुरुवात झाली," असं शाह म्हणाले.
"29 एप्रिल रोजी एक अफवा पसरली की जंगल क्षेत्राला गावांचा दर्ज दिला जाणार. त्यामध्ये मणिपूर हायकोर्टाने आगीत तेल ओतण्याचं काम केलं. कोणालाही विश्वासात न घेता मैतेई समुहाला आदिवासी घोषित करण्याचे आदेश दिले. यानंतरच हिंसाचार सुरु झाला. या ठिकाणी परिस्थितीजन्य हिंसा झाली," असं केंद्रीय गृहमंत्री म्हणाले.
"मणिपूरमध्ये यापूर्वीही दोन वेगवेगळ्या गटांमध्ये हिंसाचार झालेला आहे. यापूर्वी नरसिंम्हा राव यांच्या सरकारच्या कालावधीमध्ये 1993 साली नागा आणि कुकी समाजामध्ये हिंसाचार झाला होता. त्यामध्ये 750 जणांनी प्राण गमावले होते," असं शाह म्हणाले.