Amritpal Singh: 3 गाड्या, 4 लूक अन्...; चित्रपटांनाही लाजवेल असा थरार; समोर आले फोटो, Videos

Amritpal Singh: 'वारिस पंजाब दे'चा (Waris Punjab De) म्होरक्या अमृतपाल सिंग (Amritpal Singh) अद्यापही फरार आहे. अमृतपाल सिंग कशाप्रकारे पळून गेला यासंबंधी अनेक अंदाज लावले जात आहेत. दरम्यान, पोलिसांनी कोर्टात यासंबंधी माहिती दिली आहे.   

Updated: Mar 21, 2023, 08:15 PM IST
Amritpal Singh: 3 गाड्या, 4 लूक अन्...; चित्रपटांनाही लाजवेल असा थरार; समोर आले फोटो, Videos title=

Amritpal Singh: 'वारिस पंजाब दे'चा (Waris Punjab De) म्होरक्या अमृतपाल सिंग (Amritpal Singh) अद्यापही फरार आहे. अमृतपाल सिंग सध्या कुठे आहे याबद्दल पोलिसांनाही कोणती माहिती नाही. दरम्यान अमृतपाल सिंग भारताबाहेर पळून गेल्याची शक्यता असून, कोर्टानेही याप्रकरणी पंजाब पोलिसांना खडे बोल सुनावले आहेत. राज्यात 80 हजार पोलीस असतानाही अमृतपाल सिंग फरार कसा झाला अशा शब्दांत कोर्टाने पोलिसांना फटकारलं आहे. दरम्यान जालंधर पोलिसांनी कोर्टात संपूर्ण घटनाक्रम सांगितला आहे.
 
पोलिसांनी कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केलं असून त्यात देण्यात आलेल्या माहितीनुसार, 18 मार्चला अमृतपालला अटक करण्यासाठी एक ऑपरेशन आखण्यात आलं होतं. पोलिसांनी यासाठी नाकाही उभारला होता. त्याचवेळी अमृतपाल आणि त्याच्या गाड्यांचा ताफा तिथे पोहोचला होता. तो स्वत: मर्सिडीजमध्ये होता. त्याचे सहकारी दुसऱ्या गाडीत होते. पोलिसांच्या नाक्याजवळ चार गाड्या आल्या होत्या. पोलिसांनी हा ताफा तात्काळ रोखला होता. पण त्यांनी थांबण्याऐवजी गाडीचा वेग वाढवला आणि बॅरिकेट्स तोडले. याप्रकरणी एफआयआरदेखील दाखल करण्यात आला आहे. 

खालचियान पोलीस स्थानकात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसंच सर्व पोलीस स्थानकांना अलर्ट पाठवण्यात आला होता. चार गाड्या बॅरिकेड्स तोडून गेल्यात असून, त्या सर्वांना पकडायचं आहे असं सर्वांना कळवण्यात आलं होतं. 

पोलिसांना असा दिला गुंगारा

पोलीस आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, अमृतपाल आणि त्याचे सहकारी फार वेगाने गाड्या चालवत होते. सलेमा गावाच्या सरकारी शाळेजवळही बेदरकारपणे गाडी चालवण्यात आली. चॉकलेटी रंगाच्या गाडीत स्वत: अमृतपाल सिंग होता. लोकांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी तो रायफल दाखवत होता. यानंतर गाडी तिथेच सोडून तो दुसऱ्या ब्रेझा गाडीतून निघून गेला. तो व त्याचे सहकारी शाहकोटसाठी निघाले होते. अमृतपाल प्लेटिना बाइक आणि त्याचा साथीदार बुलेटवरुन निघाले होते. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमृतपालने सोडलेली गाडी जप्त करण्यात आली आहे. त्याच्या गाडीतून रायफल, 57 जिवंत काडतुसं जप्त करण्यात आली आहेत. याप्रकरणीही वेगळा एफआयआर दाखल करण्यात आला आहे. 

प्रतिज्ञापत्रात देण्यात आलेल्या माहितीनुसार, अमृतपाल सध्या कायदेशीर प्रक्रियेपासून पळण्याचा प्रयत्न करत आहे. अद्याप त्याला ताब्यात घेण्यात आलेलं नाही. तो अंडरग्राऊंड झाला असून, अटक होऊ नये यासाठी प्रयत्न करत होता. दरम्यान अमृतपालला याआधी ताब्यात घेतलेलं नाही किंवा अटक केलेलं नाही असं पोलीस आयुक्तांनी सांगितलं आहे. 

कोर्टाने मात्र पोलिसांच्या कारवाईवर नाराजी जाहीर केली आहे. गुप्तचर यंत्रणा पूर्णपणे अपयशी असल्याचं कोर्टाने सांगितलं आहे. योजना आखलेली असतानाही अमृतपाल सिंग फरार कसा झाला? अशी विचारणा कोर्टाने केली आहे.