How Mosquitoes Found Human In Night: डास म्हटलं की गुणगुण करून त्रास देणारा सर्वात वाईट कीटक..रात्री झोप मोड करून चावून चावून मनुष्य प्राण्याला हैराण करून सोडतो. डास चावला की मलेरिया आणि डेंग्युसारख्या आजारांना निमंत्रण मिळतं ते वेगळंच. त्यामुळे डास पळवून लावण्यासाठी वेगवेगळे क्लुप्त्या लढवल्या जातात. क्वचितच असे कोणतेही घर असेल जिथे लोक डासांपासून वाचण्यासाठी रात्रीच्या वेळी कॉइल, लिक्विड, अगरबत्ती वापरत नाहीत. मात्र याचाही डासांवर कोणताही परिणाम होत नाही. डास रात्रभर तुमचे रक्त शोषून घेतात. पण रात्रीच्या अंधारातही डास तुमच्यापर्यंत कसे पोहोचतात? असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. आज आम्ही तुम्हाला अंधारातही डास कसे शोधतात याबाबत सांगणार आहोत.
जाणून घ्या डास आपल्याला का चावतात?
खरं तर डास आपल्याला चावत नाहीत, तर आपलं रक्त शोषतात. पण तुमच्या आजूबाजूला फिरणारे सर्वच डास तुमचे रक्त शोषत नाहीत. फक्त मादी डास असं करतात. या माध्यमातून मादी डास त्यांच्या अंड्यांचा विकास आणि पोषण करतात. वास्तविक, अंड्यासाठी जे पोषक तत्वे लागतात, ती मानवी रक्तात मिळतात.
माणसांच्या श्वासोच्छवासावरून डास अंधारात माणसं शोधतात. जेव्हा आपण श्वास सोडतो तेव्हा त्यातून कार्बन डायऑक्साइड बाहेर पडतो. त्याचा वास डासांना आपल्याकडे आकर्षित करतो. मादी डासांचे 'सेन्सिंग ऑर्गन्स' खूप प्रभावशील असतात. कोणतीही मादी डास 30 फुटांपेक्षा जास्त अंतरावरूनही कार्बन डायऑक्साइडचा वास ओळखू शकते. या वासाच्या मदतीने ते अंधारातही तुमच्यापर्यंत पोहोचतात. कार्बन डायऑस्काइड व्यतिरिक्त, डास मानवांपर्यंत पोहोचण्यासाठी शरीरातील उष्णता, गंध आणि घाम यांसारखे इतर सिग्नल देखील वापरतात.