Investment Planning 60:20:20 Rule : जागतिक आर्थिक मंदीमुळं जगभरातील नोकरदार वर्गापुढे अनेक संकटं आल्याचं पाहायला मिळालं. अनेकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या, तर काहींचं काम कायमस्वरुपी बंद झालं. खासगी क्षेत्रातील नोकरीवर या परिस्थितीमुळं सर्वाधिक परिणाम झाल्याचं लक्षात आलं असून, या क्षेत्रातील मंडळींनी काळानुरूप आर्थिक नियोजनावर अधिक भर दिल्याचं पाहायला मिळालं.
महिन्याचा पगार खात्यात येतो, खर्च होतो आणि महिन्याच्या मध्यावरच खातं रितं होऊन आपले पैसे नेमके गेले कुठे हाच प्रश्न अनेकांना पडतो. बरं, त्यातही पगाराची श्रेणी किंवा स्तर मध्यम असे तर ही आव्हानं अधिकच त्रासदायक ठरतात. अशा वेळी नेमकं काय करावं? पैसा हातात टिकवून ठेवयाचा तरी कसा? हाच अनेकांपुढे पडणारा महत्त्वाचा प्रश्न. आर्थिक आव्हानं पेलताना अनेक मंडळी धनाढ्य होण्याच्या स्वप्नांचा पाठलागही सोडतात. पण, आर्थिक सल्लागारांच्या मते यामध्ये विचारसरणी आणि गोष्टींकडे पाहण्याचा दृष्टीकोन आणि किमान आकडेमोड तुम्हाला बरीच मदत करू शकते.
महिन्याच्या खर्चावर नियंत्रण मिळवण्यासाठी या खर्चाचं नियोजन आणि पगाराची विभागणी अतिशय महत्त्वाची आहे. यामध्ये पहिला टप्पा म्हणजे पगाराची गरजेनुसार वाटणी करणं. तुमच्या खात्यात जो पगार येतो त्या पगारातील रक्कम गरजेनुसार वेगळी काढणं हा सर्वात सोपा कानमंत्र. उदाहरणार्थ, तुमचा पगार महिना 50000 रुपये आहे.
अशा परिस्थितीत पगाराचा 60 टक्के भाग महत्त्वाच्या कामांवर खर्च करावा. यामध्ये महिन्याचा किराणा, वीज-पाणी बिल, शिक्षण अशा खर्चांचा समावेश आहे. काही मंडळींच्या या गरजा कमी असल्यास एखाद्या गुंतवणुकीत्या हिशोबानं करण्यात आलेल्या व्यवहारासाठीसुद्धा ही रक्कम खर्ची घातली जाऊ शकते.
पगारातील 20 टक्के रक्कम भटकंती, औषधं, बाहेर जेवण, नाटक- सिनेमा या आणि अशा वैयक्तिक पसंतीच्या कामांवर खर्च करावा आणि पगारातील उर्वरित म्हणजेच 20 टक्के रक्कम बचतीसाठी वापरावी. म्हणजेच साधारण 10 हजार रुपये ही तुमची महिन्याची निव्वळ बचत असेल. या रकमेनुसार एका वर्षाला 1.20 लाख रुपये इतकी रक्कम हातात राहते.
दर महिन्याला म्युच्युअल फंड, एसआयपी किंवा बॉण्ड मध्ये ही रक्कम गुंतवल्यास चक्रवाढ व्याजानं तुमच्या पैशांचा आकडा वाढत जातो. पुढील 20 वर्षांसाठी ही गुंतवणूक केल्यास निवृत्तीच्या वयात तुमच्या हाती सरासरी 12 टक्के परताव्यानुसार तब्बल 1,51,59,550 इतकी रक्कम मिळू शकते. अर्थात शेअर बाजाराची स्थिती आणि जागतिक अर्थसत्ता या साऱ्याचा परिणामही या गुंतवणुकीमध्ये दिसून येतो.
(वरील पर्यायांमध्ये गुंतवणूक जोखमीची असून, तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. वरील माहिती उपलब्ध संदर्भांवर आधारित असून, झी 24 तास असा कोणताही दावा करत नाही.)