चार्ट लागल्यानंतरही मोबाईलवर रेल्वेचं तिकीट मिळवण्यासाठी IRCTC ची नवी सुविधा

तुमच्या पसंतीच्या रेल्वेचं तिकीट प्रत्येक वेळेस मिळतचं असे नाही. 

Updated: Jul 31, 2018, 04:30 PM IST
चार्ट लागल्यानंतरही मोबाईलवर रेल्वेचं तिकीट मिळवण्यासाठी IRCTC ची नवी सुविधा  title=

मुंबई : तुमच्या पसंतीच्या रेल्वेचं तिकीट प्रत्येक वेळेस मिळतचं असे नाही. अनेकदा चार्ट लागेपर्यंत तुम्हांला वाट पहावी लागते. तरीही तिकिट मिळेलच याची खात्री नसते. आता रेल्वेने दिलेल्या नव्या सुविधेमुळे तुमची सारी धावपळ कमी होणार आहे. 

घरबसल्या मोबाईलवर आणि रेल्वेचा चार्ट तयार झाल्यानंतरही कन्फर्म तिकीट बुकिंग मिळवण्याची सोय आता उपलब्ध झाली आहे. यापूर्वी करंट बुकिंग करण्यासाठी तुम्हांला रेल्वे स्थानकावर तिकीट काऊंटरवर त्याबाबत विचारणा करावी लागत असे. मात्र आता करंट बुकिंगही मोबाईलवर उपलब्ध करून दिला आहे. 

कशी आहे ही सुविधा ? 

चार्ट तयार झाल्यानंतर ज्या ट्रेनमध्ये आसनं रिकामी आहेत त्याची बुकिंग आता करंट बुकिंग फॅसिलिटीद्वारा बुक करण्याची सोय देण्यात आली आहे. करंट बुकिंगमध्ये तिकीट मिळवण्यासाठी IRCTC Rail Connect App आणि IRCTC च्या वेबसाईटवर खास बुकिंग व्यवस्था देण्यात आली आहे. 

कसं कराल करंट बुकिंग ? 

रेल्वेचं तिकीट मोबाईलवर बुक करण्यासाठी IRCTC Rail Connect App मदत करते. 
या अ‍ॅपवर ट्रेनचा चार्ट तयार झाल्यानंतर  Current Avialble चा पर्याय दिसतो. 
तुम्हांला कोणत्या क्लासमधून प्रवास करायचा आहे त्याची माहिती द्या आणि तुमचं तिकीट बुक करा. 

5 जुलै 2018 ला करंट रिझर्व्हेशन सुविधे अंतर्गत सुमारे 40,781 तिकीटांची विक्री झाली होती. त्यामुळे तात्काळ तुम्हांला एखादी ट्रीप प्लॅन करायची वेळ आल्यास रेल्वेची ही नवी सुविधा तिकीट बुकिंगचं टेन्शन दूर करायला नक्की मदत करू शकते. 

नवं फीचर 

रेल्वेच्या अ‍ॅपसोबतच IRCTC च्या वेबसाईटवरही एक नवं फीचर जोडण्यात आलं आहे. त्याद्वारा तिकीट खिडकीवर विकत घेतलेले तिकीट मोबाईलवर रद्द करू शकता.