नवी दिल्ली: पाकिस्तानची सर्व एफ-१६ विमाने सुरक्षित असल्याचा अमेरिकन मासिकाचा दावा केंद्रीय संरक्षणमंत्री निर्मला सितारामन यांनी फेटाळून लावला आहे. अमेरिकन मासिकाचे वृत्त पूर्णपणे निराधार आहे. हे वृत्त देण्यापूर्वी संबंधित मासिकाने माहितीची आणि तथ्यांची खातरजमा करून घ्यायला पाहिजे होती. कारण भारतीय हद्दीत AMRAAM या क्षेपणास्त्राचे अवशेष सापडले आहेत. हे क्षेपणास्त्र केवळ एफ-१६ विमानामध्येच असते. याशिवाय, भारताकडे एफ-१६ विमानाने भारतीय हद्दीत प्रवेश केल्याचे इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर पुरावे असल्याचेही सितारामन यांनी सांगितले.
अमेरिकास्थित एका मासिकात प्रसिद्ध झालेल्या लेखात अमेरिकेने पाकिस्तानला दिलेल्या सर्व एफ-१६ विमानांची मोजणी झाल्याचा दावा करण्यात आला होता. तेव्हा पाकिस्तानच्या ताफ्यातील एफ-१६ विमानांची संख्या जैसे थे असल्याचे या मासिकाने म्हटले होते. मात्र, भारतीय वायूदलाने या दाव्याचे खंडन केले. विमानातील कॅमेरा आणि रडारच्या पुराव्यानुसार विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी आपल्या बायसन मिग-२१ विमानाने पाकच्या एफ-१६ विमानाचा वेध घेतल्याचे स्पष्ट होत असल्याचे सांगत वायूदलाने अनेक पुरावे समोर ठेवले होते.
Nirmala Sitharaman on US magazine report that Pakistan didn't lose F-16 jet on Feb 27: IAF gave proof on it with electronic signature of F-16. Whoever has written it, it's baseless&source based. The part of AM-RAAM missile, which is used only with F-16, how was it found in India? pic.twitter.com/SYgEwo2JfV
— ANI (@ANI) April 6, 2019
Nirmala Sitharaman on US journal report that Pakistan didn't lose F-16 jet on Feb 27: The article that came in “Foreign Policy", many people are calling it baseless.Someone showed me on social media that US officials are also saying that they didn't conduct any such investigation pic.twitter.com/JDBgleUMUt
— ANI (@ANI) April 6, 2019
भारतीय वायूदलाने २६ फेब्रुवारीला पहाटे पाकव्याप्त काश्मीरमधील बालाकोट परिसरात एअर स्ट्राईक केला होता. यानंतर २७ फेब्रुवारीला पाकिस्तानच्या विमानांच्या तुकडीने भारतीय हद्दीत प्रवेश केला. यामध्ये एफ-१६, जेएफ-१७ आणि मिराज ३, मिराज ५ या विमानांचा समावेश होता. ही विमाने भारतीय हद्दीत घुसल्याचे लक्षात आल्यानंतर लगेचच भारतीय वायूदलाला कळवण्यात आले. त्यानुसार भारताच्या सुखोई ३० एमकेआय, मिराज-२००० आणि मिग-२१ या विमानांनी पाकिस्तानच्या विमानांवर प्रतिहल्ला केला. भारताच्या या प्रतिहल्ल्याने गांगरलेल्या पाकिस्तानी विमानांनी लगेच पळही काढला. मात्र, अभिनंदन वर्धमान यांनी आपल्या बायसन मिग-२१ विमानाने पाकच्या एफ-१६ विमानाचा पाठलाग केला. पाकव्याप्त नौशेरा सेक्टरमध्ये असताना मिग-२१ विमानातून डागण्यात आलेल्या आर७३ आर्चर या क्षेपणास्त्राने एफ-१६ विमानाचा वेध घेतला होता. त्यावेळी उत्तर दिशेला पाकचे एक जेएफ१७ विमानही होते. यावेळी AWACS प्रणालीने काही मिनिटांच्या फरकाने टिपलेल्या छायाचित्रांमध्येही एफ-१६ विमान नसल्याचे स्पष्ट झाल्याचा दावा भारतीय वायूदलाने केला होता.