Weather News : महाबळेश्वरहून पुण्यात कडाक्याची थंडी; देशाच्या दक्षिण किनारपट्टीला चक्रीवादळाचा इशारा

Maharashtra Weather News : महाराष्ट्राच्या हवामानात मागील काही दिवसांपासून होणाऱ्या बदलांमुळं तापमानातही मोठ्या प्रमाणात चढ- उतार झाल्याचं पाहायला मिळत आहे.   

सायली पाटील | Updated: Nov 30, 2024, 07:49 AM IST
Weather News : महाबळेश्वरहून पुण्यात कडाक्याची थंडी; देशाच्या दक्षिण किनारपट्टीला चक्रीवादळाचा इशारा  title=
Maharashtra Weather news mahabaleshwar pune Mumbai temprature latest news

Maharashtra Weather News : देशाच्या दक्षिण किनारपट्टी क्षेत्रावर वादळी वाऱ्यांची स्थिती कायम असतानाच इथं उत्तरेकडून वाहत येत असणाऱ्या वाऱ्याचा प्रवाह वाढल्यामुळं महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढताना दिसत आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार सातारा, सांगली, कोल्हापूर या पश्चिम महाराष्ट्रातील भागांसह उत्तर महाराष्ट्रातही थंडीचा कडाका वाढताना दिसत आहे. देशातील दक्षिण किनारपट्टी क्षेत्र मात्र या हिवाळी ऋतूला अपवाद असणाऱ्या वातावरणाची झलक दाखवत आहे. बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळं तामिळनाडू आणि लगतच्या किनाऱ्य़ांवर पावसाचा तडाखा बसण्याची दाट शक्यता असून, इथं रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

महाबळेश्वरहून निफाड, पुण्यात जास्त थंडी 

गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं वाढणाऱ्या थंडीचा कडाका पाहता राज्यात निफाड, जेऊर या भागांमध्ये निच्चांकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. इथं तापमानाचा आकडा 8 ते 6 अंशांदरम्यान असल्यामुळं थंडीनं चांगलाच जोर पकडल्याचं पाहायाला मिळत आहे. मागील काही दिवसांपासून हवेतील आर्द्रता कमी होऊन कोरड्या हवामानासाठी पूरक वातावरणनिर्मिती होत असल्यामुळं राज्यात दिवसा आणि रात्रीच्या तापमानात सातत्याने तापमानात घट होत आहे. देशातील उत्तरेकडे असणाऱ्या राज्यांमध्ये अतीव उत्तरेला असणाऱ्या पर्वतरांगांमध्ये हिमवृष्टी होण्यास सुरुवात झाली असून, पाकिस्तान आणि त्याहीपलीकडून वाहत येणाऱ्या कोरड्या शीतलहरींमुळं भारतातील उर्वरित राज्यांवर थंडीचा अधिक प्रभाव पाहायला मिळत आहे. 

देशाच्या किनारपट्टी क्षेत्रावर धडकणार चक्रीवादळ 

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचं रुपांतर 'फेंगल' चक्रीवादळात होऊन हे वादळ उत्तर-पश्चिमेकडे सरकत पुढे जाणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. प्रामुख्यानं या चक्रीवादळाचा परिणाम तमिळनाडू, आंध्र प्रदेशचा किनारपट्टी भाग, केरळ या राज्यांवर दिसणार असल्याचा सतर्कतेचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. 

 

'फेंगल' चक्रीवादळ शनिवारी सायंकाळच्या सुमारास तामिळनाडूच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. दरम्यानच्या काळात संततधार पावसाच्या पार्श्वभूमीवर दक्षिणेकडील राज्यांच्या विविध भागांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.