Zika Virus Pune: झिका व्हायरसचा वाढता संसर्गामुळं आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. आत्तापर्यंत राज्यात 140 रुग्ण झिकाचे आढळले आहेत. त्यातील सर्वाधिक 109 रुग्ण हे पुण्यात आहेत. धक्कादायक म्हणजे राज्यातील एकूण रुग्णांपैकी जवळपास निम्म्या गर्भवती महिलांना झिकाची लागण झाली आहे. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्य विभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेतल्या असून रुग्णांच्या सर्वेक्षणावरदेखील भर दिला जात आहे.
राज्यात २ हजार ६८ संशयित झिका रुग्णांचे रक्तनमुने तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणूविज्ञान प्रयोगशाळेत (एनआयव्ही) पाठविण्यात आले. त्यातील १४० जणांचे झिकाचे निदान झाले. झिका रुग्ण आढळून आलेल्या परिसरात ३ ते ५ किलोमीटर परिसरात तापरुग्णांचे सर्वेक्षण आरोग्य विभागाकडून सुरू आहे. याचबरोबर झिकाचा प्रसार एडीस इजिप्ती डासांमुळे होत असल्याने कीटकनाशक फवारणीसह इतर प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत, असे आरोग्य विभागाने म्हटले आहे.
झिका व्हायरसची लागण झाल्यानंतर सांधेदुखी, डोकेदुखी, डोळे लाल होणे, उलटी होणे, अस्वस्थ वाटणे अशी लक्षणे दिसतात. मात्र, हि लक्षणे झिका व्हायरसची लागण झालेल्या 5पैकी एका व्यक्तीमध्ये दिसतात. काही लक्षणांमध्ये डोकेदुखी, ताप, शरीरावर लाल रंगाचे चट्टे दिसणे हा त्रासही रुग्णांना जाणवतो.
झिका व्हायरसची लागण गर्भवती महिलांना झाल्यास गर्भातील बाळाला मायक्रोसेफॅली आणि मेंदुशी संबंधित आजार होऊ शकतो. झिका व्हायरसची लक्षणे जाणवत असतील तर शारीरिक संबंध टाळावेत. कारण दोघांपैकी एकाच्या रक्तात झिकाचा विषाणू असेल तर अशा व्यक्तिसोहत संबंध ठेवल्यास झिकाची लागण होऊ शकते. तसंच, झिका व्हायरसची लागण झालेल्या व्यक्तीसोबत शारिरक संबंध ठेवून महिला गर्भवती राहिल्यास बाळालाही याची लागण होऊ शकते.
झिकाचा रुग्ण आढळून आल्यास परिसरात तापरुग्णांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. तसंच, गर्भवती महिलांची प्राधान्याने तपासणी, सर्व तापरुग्णांवर लक्षणाच्या आधारे उपचार, गर्भवती महिलांना झिकाच्या धोक्याबाबत मार्गदर्शन, डास प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर, संशयित रुग्णांची माहिती कळविण्याची खासगी डॉक्टरांना सूचना अशी उपाययोजना आरोग्यविभागाकडून घेण्यात येत आहे.
घरात डास होऊ देऊ नका, घरात स्वच्छता ठेवा. घराच्या खिडक्यांना आणि दरवाजांना जाळी लावा. दोन दिवस ताप राहिल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.