कोरोना हॉटस्पॉटच्या परिसरातील नागरिकांच्या अँटीबॉडी टेस्टचे निर्देश

सरकारने आतापर्यंत देशभरात कोरोनाचे १० हॉटस्पॉट निश्चित केले आहेत. 

Updated: Apr 2, 2020, 03:46 PM IST
कोरोना हॉटस्पॉटच्या परिसरातील नागरिकांच्या अँटीबॉडी टेस्टचे निर्देश title=

नवी दिल्ली: देशभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने भर पडत असल्यामुळे भारतीय वैद्यक संशोधन परिषदेने (ICMR) एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार कोरोना संक्रमणाचे हॉटस्पॉट म्हणून निश्चित करण्यात आलेल्या परिसरातील नागरिकांच्या अँटीबॉडी टेस्ट करण्यात येतील. 'द इंडियन एक्स्प्रेस'च्या वृत्तानुसार, नागरिकांच्या घसा आणि नाकातील द्रवाचे नमुने घेऊन या टेस्ट करण्यात येतील. जेणेकरून शरीरात कोरोनाच्या विषाणूंचा सामना करण्याची प्रतिकारशक्ती असलेल्या नागरिकांची नेमकी संख्या लक्षात येईल. तर अँटीबॉडी टेस्ट नेगेटिव्ह आल्यास संबंधित नागरिकांना कोरोनापासून वाचण्यासाठी होम क्वारंटाईन करण्यात येईल.

कोरोनाग्रस्तांची संख्या वाढल्यामुळे सरकार 'हा' मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

सरकारने आतापर्यंत देशभरात कोरोनाचे १० हॉटस्पॉट निश्चित केले आहेत. यामध्ये दिल्लीतील दिलशाद गार्डन, निझामुद्दीन परिसराचा समावेश आहे. तर महाराष्ट्रातील मुंबई आणि पुणे ही दोन्ही शहरे कोरोनाचे हॉटस्पॉट आहे. याशिवाय, नोएडा, मेरठ, भिलवाडा, अहमदाबाद, कासरगोडा आणि केरळमधील पतनमतिट्टा ही ठिकाणेही कोरोनाची हॉटस्पॉट आहेत.

अँटीबॉडी टेस्ट म्हणजे काय?
अँटीबॉडी हे एक Y आकाराचे प्रोटीन असते. मानवी शरीरातील B सेलकडून या प्रोटीनची निर्मिती केली जाते. या अँटीबॉडीजच्या सहाय्याने शरीराच्या रोगप्रतिकारक यंत्रणेवर हल्ला करणाऱ्या विषाणू किंवा जिवाणुंचा शोध घेतला जातो. हे Y आकाराचे प्रोटीन बाहेरील जिवाणू आणि विषाणूंना प्रतिबंध करते. त्यामुळे शरीरातील बी सेलना विषाणू आणि जीवाणूचे नेमके स्वरुप लक्षात येते. यानंतर बी सेलकडून रोगाला अटकाव करण्यासाठी शरीरात अशाच अँटीबॉडीजची निर्मिती केली जाते. 

त्यामुळे एखाद्याच्या शरीरात कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी अशाप्रकारच्या अँटीबॉडीज असतील तर संबंधित व्यक्ती कोरोनाची लागण झाली तरी त्यामधून बरा होईल. मात्र, शरीरात अशाप्रकारच्या अँटीबॉडीज नसतील तर त्याला कोरोनाचा जास्त धोका असू शकतो. त्यामुळे या व्यक्तींना कोरोनपासून वाचण्यासाठी होम क्वारंटाईनमध्ये राहण्याचा सल्ला दिला जाईल.