नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या पाच वर्षांत बॉम्ब आणि इतर स्फोटकांच्या संख्येत सतत वाढ होत असल्याची माहिती एका अहवालातून उघडकीस आली आहे. नक्षलवादी भागातील स्फोटकांच्या संख्येच्या तुलनेत जम्मू-काश्मीरमध्ये स्फोटकांच्या संख्येत ५७ टक्क्यांची वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे.
पाकिस्तान आणि चीनच्या सीमाभागात असलेल्या राज्यांमध्ये २०१४ साली ३७ बॉम्बहल्ले, २०१५ मध्ये ४६ बॉम्बहल्ले, २०१६ मध्ये ६९ बॉम्बहल्ले, २०१७ मध्ये ७० तर २०१८ मध्ये ११७ बॉम्बहल्ले झाल्याची माहिती मिळाली आहे. राष्ट्रीय सुरक्षा गार्डच्या (एनएसजी) राष्ट्रीय बॉम्ब डेटा सेंटरकडून घेण्यात आलेल्या दोन दिवसीय सम्मेलनात यासंबंधी अहवाल सादर करण्यात आला होता. या अहवालात जम्मू-काश्मीरमध्ये देशी तसेच इतर विस्फोटकांच्या संख्येत होणाऱ्या वाढीबाबत उल्लेख करण्यात आला. १४ फेब्रुवारी रोजी करण्यात आलेला हल्ला हा दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदने केल्याचे उघड झाले त्याचवेळी हा अहवालही समोर आला. आत्मघाती हल्ला करणाऱ्या गाडीमध्ये २० किलोग्रम आरडीएक्स मिश्रीत असणाऱ्या स्फोटकांच्या कारने सीआरपीएफ जवानांच्या गाडीला धडक देण्यात आली.
या अहवालानुसार, जम्मू-काश्मीर वगळता इतर देशातील सर्व भागात बॉम्बहल्ल्यात मोठी कमी आली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी २०१८ मध्ये देशी बॉम्बचा सर्वाधिक वापर केल्याचे अहवालातून समोर आले आहे. देशभरात देशी बॉम्बची संख्या कमी झाली असली तरी जम्मू-काश्मीर भागात या बॉम्बच्या संख्येत वाढ झाली असल्याचे सांगण्यात येत आहे.