मुंबई: पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने चर्चेने समस्या सोडवण्याचा प्रयत्न करावा, असा शहाजोग सल्ला देणारे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना बॉलीवूड दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांनी चांगलेच फटकारले आहे. त्यांनी इम्रान खान यांना उद्देशून केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, चर्चेने प्रश्न सुटत असते तर तुमचा तीनवेळा घटस्फोट झालाच नसता. एखादी व्यक्ती स्फोटके घेऊन तुमच्यावर चालून येत असेल तर त्याच्याशी संवाद कसा साधायचा, हे तुम्हीच आम्हा अज्ञानी भारतीयांना शिकवावे. त्यासाठी आम्ही तुम्हाला योग्य मोबदलाही देऊ, असे उपरोधिक वक्तव्य रामगोपाल वर्मा यांनी केले आहे.
पुलवामा येथे जैश-ए-मोहम्मदच्या आत्मघातकी दहशतवाद्याने घडवून आणलेल्या स्फोटात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) ४० जवान शहीद झाले होते. या हल्ल्यामुळे संपूर्ण देशात संतापाचे वातावरण आहे.
इम्रान खान यांनी नुकतीच पुलवामा हल्ल्यासंदर्भात पाकिस्तानची बाजू मांडली होती. या हल्ल्यात आमचा कोणताही सहभाग नव्हता. पुलवामा दहशतवादी हल्ल्यासंदर्भात भारताने आम्हाला पुरावे द्यावेत. यानंतर आम्ही नक्की कारवाई करू, असे इम्रान खान यांनी म्हटले होते. यावेळी त्यांनी भारताने आमच्यावर हल्ला केल्यास प्रत्युत्तर देण्याची दर्पोक्तीही केली होती. युद्ध सुरू करणे हे आपल्या हातात असते. मात्र, हे युद्ध आपल्याला कोणत्या दिशेने घेऊन जाईल, हे देवालाच माहिती आहे. त्यामुळे ही समस्या चर्चेनेच सोडवली पाहिजे, असेही इम्रान खान यांनी म्हटले होते.