लोन न घेताच तुम्ही व्हाल कर्जदार, फसवणूकीचा नवा फंडा

तुम्हालाही लोन घेतल्याचे मेसेज आले असतील तर सावध व्हा, अशी घ्या खबरदारी

Updated: May 6, 2022, 06:41 PM IST
लोन न घेताच तुम्ही व्हाल कर्जदार, फसवणूकीचा नवा फंडा title=

Illegal Loan App: बनावट लोन अॅप्सनेद्वारे व्याजाने कर्ज देणं, वसुलीसाठी ग्राहकांचा छळ करणे अशी प्रकरणे तुम्ही आजपर्यंत ऐकली असतीलच. पण आता बेकायदेशीर लोन अॅप्सद्वारे फसवणुकीचा नवा मार्ग शोधला आहे. कर्ज न घेता कर्ज घेतल्याचे मेसेज येत असून धक्कादायक म्हणजे यानंतर लोकांना कर्ज फेडण्याच्या धमक्या ही दिल्या जात आहेत. 

अशी केली जाते फसवणूक
गेल्या काही महिन्यांपासून देशातील विविध भागात सायबर सेलकडे अशा तक्रारी आल्या आहेत. ज्यांनी कर्ज घेतलं नाही त्यांना कर्ज भरण्यासंबंधीचे मेसेज येत आहेत. एखाद्या अनोळखी नंबरवर मेसेज पाठवला जातो, किंवा एखाद्याने लोनसाठी अर्ज केला असेल अशा लोकांचा डेटा शोधून त्यांना कर्ज घेतल्याचा मेसेज पाठवला जातो. 

मेसेजमध्ये कर्ज घेतल्याची तारीख दिली जात आहे. कर्जाचे पैसे ताबडतोब भरा, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल असं धमकावलंही जात आहे. पैसे भरण्यासाठी लिंकही पाठवण्यात येते. 

अशी दिली जाते धमकी
जर तुम्ही पैसे दिले नाहीत, तर तुमचा फोटो आणि इतर तपशील तुमच्या संपर्कातील सर्व मित्र आणि नातेवाईकांना शेअर केले जातील. तुम्ही फ्रॉड असून तुमच्याशी कोणताही आर्थिक व्यवहार करु नका असं सांगितलं जाईल, अशी धमकी संबंधित व्यक्तीला दिली जाते. कायदेशीर अडचणीत येऊ नये म्हणून काही लोकं पैस देतात.

अनेक लोकं त्या लिंकवर क्लिक करतात, पण लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमचा फोन हॅक केला जातो, आणि ऑनलाईन अॅपच्या माध्यमातून तुमच्या खात्यातले पैसे लंपास केले जातात.

अशी घ्या खबरदारी
असा कोणताही मेसेज आला तर त्याकडे दुर्लक्ष करणेच योग्य, कर्ज घेतलेच नाही तर घाबरायचे का.
मेसेजमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करू नका तसंच तो मेसेज ताबडतोब ब्लॉक करा
कोणत्याही परिस्थितीत तुमचं बँक स्टेटमेंट शेअर करू नका. 
अशा घटनेची माहिती पोलिस आणि सायबर सेलला कळवा.
तुम्हाला कोणत्याही अनोळखी नंबरवरून असे मेसेज आल्यास त्याची त्वरित तक्रार करा आणि नंबर ब्लॉक करा