NCRB Report : वर्षभरात अपघातांची धक्कादायक आकडेवारी, मृतांमध्ये दुचाकीस्वारांचं प्रमाण जास्त

नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) च्या वार्षिक अहवालात ही बाब समोर आली आहे

Updated: Oct 29, 2021, 11:00 PM IST
NCRB Report : वर्षभरात अपघातांची धक्कादायक आकडेवारी, मृतांमध्ये दुचाकीस्वारांचं प्रमाण जास्त title=

मुंबई : देशात गेल्या म्हणजे 2020 या वर्षात अपघाती मृत्यूंची 3 लाख 74 हजार 397 प्रकरणं नोंदवली गेली आहेत. यात तब्बल 35 टक्के लोकांचा मृत्यू हा रस्ते अपघातात झाल्याचं समोर आलं आहे. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) च्या वार्षिक अहवालात ही बाब समोर आली आहे. 2020 मध्ये अपघाती मृत्यूंची संख्या 2019 च्या तुलनेत कमी आहे. 2019 मध्ये हा आकडा 4 लाख 21 हजार 104 इतका होता.

रस्ते अपघाताची कारणं

केंद्रीय गृह मंत्रालया अंतर्गत येणाऱ्या NCRB ने म्हटले आहे की, 2020 मध्ये प्रति लाख लोकसंख्येमागे अपघातातील मृत्यूचे प्रमाण 27.7 टक्के इतकं आहे, जे गेल्या वर्षी 31.4 टक्के होतं. 2020 मध्ये देशात 3 लाख 54 हजार 796 रस्ते अपघातांची नोंद झाली. ज्यामध्ये 1 लाख 33 हजार 201 लोकांचा मृत्यू झाला आणि 3 लाख 35 हजार 201 जण जखमी झाले. या अहवालात म्हटलं आहे की 60 टक्क्यांहून अधिक रस्ते अपघात हे वेगामुळे झाले आहेत. ज्यामध्ये 75,333 लोकांचा मृत्यू झाला आहे आणि 2 लाख 9 हजार 736 लोक जखमी झाले आहेत.

दुचाकीस्वारांच्या अपघातांचं प्रमाण अधिक

NCRB च्या अहवालानुसार रस्ते अपघातात 43.6 टक्के बळी हे दुचाकीस्वारांचे होते. त्यानंतर कार, ट्रक किंवा लॉरी आणि बसेसच्या अपघातांचं प्रमाण 13.2 टक्के इतंक आहे. धोकादायक किंवा वेगाने ड्रायव्हिंग किंवा ओव्हरटेकिंगमुळे 24.3 टक्के रस्ते अपघात झाले. ज्यामुळे 35,219 मृत्यू आणि 77,067 लोकं जखमी झाले.

एनसीआरबीच्या अहवालात केवळ 2.4 टक्के रस्ते अपघात खराब हवामानामुळे झाल्याचं म्हटलं आहे. आकडेवारीनुसार, 2,11,351 प्रकरणे (59.6 टक्के) ग्रामीण भागात आणि 1,43,445 (40.4 टक्के) शहरी भागात नोंदवली गेली आहेत. याशिवाय, एकूण रस्ते अपघातांपैकी 31.8 टक्के अपघात हे निवासी भागाजवळ झाले आहेत.

रेल्वे अपघाताची आकडेवारी

NCRB अहवालानुसार 2020 मध्ये एकूण 13,018 रेल्वे अपघातांची नोंद झाली. ज्यामध्ये 1,127 लोक जखमी झाले आणि 11,968 लोकांचा मृत्यू झाला. 70 टक्के रेल्वे अपघात हे ट्रेनमधून पडल्याने किंवा ट्रेनच्या धडकेने झाले आहेत. रेल्वे क्रॉसिंग अपघाताच्या 1,014 घटनांमध्ये 1,185 जणांचा मृत्यू झाला आणि 71 लोक जखमी झाले. उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक रेल्वे क्रॉसिंग अपघातांची नोंद झाली आहे (1,014 पैकी 380 घटना), जे अशा अपघातांपैकी 37.5 टक्के आहेत.