हैदराबाद: मुलींनी किंवा महिलांनी सातच्या आत घरात आलेच पाहिजे, अशा विचारसरणीच्या व्यक्ती किंवा कुटुंबांबद्दल आपण आजपर्यंत अनेक किस्से ऐकले असतील. स्त्रियांना बंधनात ठेवणाऱ्या या विचारसरणीविषयी अनेक मतमतांतरेही पाहायला मिळतात. मात्र, आता आंध्र प्रदेशातील एका गावाने तर याबाबतीत हद्दच ओलांडली आहे.
पश्चिम गोदावरी परिसरात असणाऱ्या टोकालापल्ली गावात गेल्या काही महिन्यांपासून महिलांवर एक जाचक नियम लादण्यात आला आहे. त्यानुसार सकाळी ७ ते संध्याकाळी सात या वेळेत गावातील महिलांना नाईटी किंवा तत्सम कपडे घालण्यास मनाई करण्यात आली आहे.
गावातील ज्येष्ठ सदस्यांच्या समितीने हा फतवा काढला. त्यानुसार ज्या महिला हा नियम तोडतील त्यांना १८०० रूपयांचा दंड भरावा लागेल. एवढेच नव्हे तर जी व्यक्ती महिला लपून नाईटी परिधान करत असल्याची खबर देईल, त्याला एक हजार रुपयांचे बक्षिसही मिळेल.
हा फतवा काही महिन्यांपूर्वी काढला असला तरी त्याबद्दल फारशी वाच्यता झाली नव्हती. मात्र, आता हे प्रकरण अचानक प्रकाशझोतात आले असून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यानंतर सरकारी अधिकाऱ्यांनी या गावाला भेटही दिली.
मात्र, गाव बहिष्कार टाकेल, या भीतीने लोक याबद्दल बोलायला तयार नाहीत. पंचायतीकडून लोकांवर यासाठी दबाव आणला जात आहे. सरकारी अधिकारी किंवा प्रसारमाध्यमांसमोर याबद्दल काहीच बोलायचे नाही, अशी धमकीच पंचायतीने गावकऱ्यांना दिली आहे.
याविषयी टोकालापल्लीच्या सरपंच फन्तासिया महालक्ष्मी यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या की, उघड्यावर कपडे धुणे, खरेदीसाठी बाजारात जाणे किंवा नाईटीसारखी कपडे घालून सार्वजनिक कार्यक्रमांना येणे चांगले लक्षण नाही. यासंदर्भात काही महिलांनीच गावातील ज्येष्ठांकडे तक्रार केल्याचे महालक्ष्मी यांनी सांगितले. मात्र, यासाठी कोणावरही जबरदस्ती करण्यात आली नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.