कुलभूषण जाधव केसमध्ये भारताचा १ रुपया तर पाकिस्तानचे इतके कोटी खर्च

कॅंब्रिज विद्यापीठात कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या स्नातक कुरैशी आयसीजेमध्ये केस लढणारे सर्वात कमी वयाचे वकील

Updated: Jul 18, 2019, 07:52 AM IST
कुलभूषण जाधव केसमध्ये भारताचा १ रुपया तर पाकिस्तानचे इतके कोटी खर्च  title=

नवी दिल्ली : कुलभूषण जाधव प्रकरणात आंतरराष्ट्रीय न्यायालयाने भारताच्या बाजुने निर्णय दिलाय. पाकिस्तानने केलेले सर्व युक्तीवाद फेटाळण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, १६ पैंकी १५ न्यायाधिशांनी भारताच्या बाजूनं निकाल दिलाय. यामुळे कुलभूषण जाधवांना राजनैतिक मदत देण्याचा मार्ग मोकळा झालाय. कुलभूषण यांना पाकिस्तानने सुनावलेल्या शिक्षेविरोधात ज्येष्ठ विधीज्ञ हरिश साळवे यांनी बाजू मांडली. यासाठी त्यांनी केवळ १ रुपया इतके मानधन घेतले. तत्कालिन परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी १५ मे २०१७ ला ट्वीट करुन यासंदर्भात माहिती दिली होती. आता या निकालानंतर हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

पाकिस्तान सरकारने गेल्यावर्षी राष्ट्रीय संसदेतील आर्थिक संकल्पात हेगमधील आंतरराष्ट्रीय न्यायालयात कुलभूषण जाधव प्रकरणातील खर्चाची माहिती दिली. ही केस लढणाऱ्या खावर कुरैशी यांना २० कोटी रुपये दिल्याचे यावेळी सांगण्यात आले. कॅंब्रिज विद्यापीठात कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या स्नातक कुरैशी आयसीजेमध्ये केस लढणारे सर्वात कमी वयाचे वकील आहेत. 

या सुनावणी दरम्यान न्यायालयानं पाकिस्तान मानवाधिकारांवरूनही फटकारलं. कुलभूषण जाधवांच्या प्रकरणात मानवाधिकारांचं उल्लंघन झाल्याचा ठपका न्यायालयानं पाकिस्तानवर ठेवलाय. तसंच व्हिएन्ना कराराचं पाकिस्तानकडून उल्लंघन झाल्याचा उल्लेखही आंतराराष्ट्रीय न्यायालयानं केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या निकालानंतर सोशल मीडियावरून आपली प्रतिक्रिया व्यक्त केलीय. सत्य जाणून निर्णय दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आयसीजेला शुभेच्छा दिल्यात. कुलभूषण जाधव यांना न्याय मिळेल, अशीही खात्रीही त्यांनी यावेळी व्यक्त केली.