इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत वाढवली

इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत वाढवली आहे. त्यामुळे रिटर्न भरणाऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय. 

Updated: Jul 26, 2018, 07:35 PM IST
इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत वाढवली title=

नवी दिल्ली : सरकारने इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत वाढवली आहे. त्यामुळे रिटर्न भरणाऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय. टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत ३१ जुलै २०१८ पर्यंत होती. ही तारीख आता वाढवून देण्यात आली आहे.

इन्कम टॅक्स रिटर्न अर्थात प्राप्तिकर परतावा भरण्याच्या मुदतीत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता तुम्हाला ३१ ऑगस्ट २०१८ पर्यंत प्राप्तिकर परतावा भरता येणार आहे.  वर्ष २०१७-२०१८ या आर्थिक वर्षात प्राप्तिकर परतावा दाखल करावयाची करदात्यांसाठी शेवटची तारीख वाढवून ३१ ऑगस्ट करण्यात आली आहे.

इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये करदात्यांना जीएसटीची माहिती द्यावी लागणार आहे. आर्थिक वर्ष२०१७-२०१८ मध्ये तीन महिने व्हॅट कायदा व ९ महिने जीएसटी कायदा लागू होता. या आधी अप्रत्यक्ष कर कायद्याची उलाढाल आणि इतर माहिती  टॅक्स रिटर्नमध्ये द्यायची गरज नव्हती, परंतु आता शासनाने टॅक्स  रिटर्नमध्ये जीएसटीची माहिती नमूद करावयास सांगण्यात आले आहे. 

ज्या व्यक्तीचे उत्पन्न नोकरीपासून आणि इतर उत्पन्न असेल, तर त्याला प्राप्तिकराचा आयटीआर एक व आयटीआर दोन दाखल करावा लागतो. आयटीआर तीनमध्ये जीएसटीची माहिती द्यावी लागणार आहे. करदात्याला विक्रीवरील सीजीएसटी, एसजीएसटी, आयजीएसटी, यूटीजीएसटी किती आकारला, ती रक्कम नमूद करावी लागेल. ही माहिती करदात्याला जीएसटी पोर्टलवरील इलेक्ट्रॉनिक लायबलिटी रजिस्ट्ररसोबत जुळवून घ्यावी लागेल.

जर शासनाकडून जीएसटीचा रिफंड येणे बाकी असेल, तर त्याची माहिती रिटर्नमध्ये द्यावी लागेल. आयटीआर चारमध्ये जीएसटीच्या रिटर्नमध्ये दाखविलेली उलाढालीची रक्कम नमूद करावी लागेल. करदात्याने दाखल केलेल्या जीएसटीआर एक रिटर्नमधून ती मिळेल, तसेच करदात्याचा जीएसटीचा नंबर या रिटर्नमध्ये नमूद करावा लागेल.