Independence Day 2023 : देश स्वातंत्र्य होऊन काळ लोटला. अनेक वर्षांमध्ये लोकशाही राष्ट्र अशी जगभरात ख्याती असणाऱ्या भारतानं विविध क्षेत्रांमध्ये प्रगती केली. जागतिक महासत्ता असणाऱ्या राष्ट्रांशी भारताचं नातं दरम्यानच्या काळात अधिक दृढ झालं, मित्र राष्ट्रांच्या मदतीनं भारतानं प्रगतीपथावर उल्लेखनीय कामगिरी केल्याचं तुम्हीआम्ही सर्वांनीच पाहिलं. अशा या भारताच्या स्वतंत्र्य दिनाचा उत्साह सध्या देशभरात आणि परदेशातही पाहायला मिळत आहे.
भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक वीर आणि वीरांगनांनी प्राण पणाला लावले. शब्दांतही मांडता येणार नाही असा त्याग या मंडळींनी केला आणि त्यांच्या प्रयत्नांच्या बळावर अखेर ब्रिटीशांनी देशातून काढता पाय घेतला. 15 ऑगस्ट 1947 ला देश स्वतंत्र झाला. देशाला स्वतंत्र करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी बलिदान दिलं अशा सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करत देशासाठी नवे संकल्प निश्चित करण्याचा दिवस, स्वातंत्र्याचा सोहळा साजरा करण्याचा दिवस म्हणजे स्वातंत्र्य दिन. आता राहिला प्रश्न की, देश यंदा नेमका कितवा स्वातंत्र्य दिन साजरा करतोय? 76 वा की 77 वा?
काहींच्या मते स्वातंत्र दिनाचं वर्ष कितवं हे ठरवण्यासाठी 15 ऑगस्ट 1947 या दिवसापासूनच ही वर्ष मोजली जावीत. तर काहींच्या मते देशानं जेव्हा पहिला स्वातंत्र्य दिन सादरा केला ते पहिलं वर्ष धरावं. 1947 मधील 15 ऑगस्ट या तारखेपासून मोजल्यास हा देशाचा 77 व्या स्वातंत्र्य दिन असेल. आणि जर, स्वातंत्र्य दिनाच्या वर्षपूर्तीपासून गणती केल्यास हा 76 वा स्वातंत्र्य दिन ठरतो.
सरकारी एजन्सी प्रेस इंफॉर्मेशन ब्यूरो (PIB) नं मागील वर्षी म्हणजेच 2022 मध्ये 76 वा स्वातंत्र्य दिन साजरा केला होता. परिणामी यंदा देशाचा 77 वा स्वातंत्र्य दिन असणार आहे. त्यामुळं स्वातंत्र्य दिनाचा उल्लेख असेल असं काहीही लिहिणार असाल तर 77 वा स्वातंत्र्य दिन असा उल्लेख करा.
यंदाच्या वर्षी स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून कोणाची उपस्थिती असेल याबाबतची यादी शासनानं जारी केली आहे. यामध्ये 1800 प्रमुख पाहुण्यांचा समावेश आहे. विविध क्षेत्रांमध्ये देशाच्या विकासाच्या दृष्टीनं योगदान देणाऱ्या काही व्यक्तींचा यात समावेश आहे. यामध्ये शेतकऱ्यांपासून परिचारिका, मजदूर, शिक्षण आणि इतर क्षेत्रांतील मंडळी सहभागी आहेत.