बांगलादेशी महिला भारतात झाली सरपंच; लवली खातूनमुळे वाढलं ममता बॅनर्जीचं टेन्शन

Lovely Khatun News: पश्चिम बंगालमध्ये सध्या या महिला सरपंचाच्या नागरिकत्वावरुन नव्या वादाला तोंड फुटलं असून वादाचं ममता बॅनर्जी कनेक्शनही समोर येत आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jan 1, 2025, 02:01 PM IST
बांगलादेशी महिला भारतात झाली सरपंच; लवली खातूनमुळे वाढलं ममता बॅनर्जीचं टेन्शन title=
ममतांचा पक्ष अडकला वादात

Lovely Khatun News: पश्चिम बंगालमधील रशीदाबाद ग्रामपंचायतीच्या प्रमुख लवली खातून यांच्या नागरिकत्वावरुन वाद दिवसोंदिवस वाढत चालल्याचं चित्र दिसत आहे. मालदा जिल्ह्यातील तृणमूल काँग्रेसच्या नेतृत्वाखालील रशीदाबाग ग्रामपंचायतीच्या सरपंच असलेल्या लवली खातून या मूळच्या बांगलादेशी असल्याचं सांगितलं जात आहे. त्या अनिवासी बांगलादेशी असून त्यांनी पासपोर्टशिवाय बेकायदेशीरपणे भारतात घुसखोरी केल्याचा आरोप आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, खातून यांचं खरं नाव नासिया शेख असं असल्याचं सांगितलं जात आहे. अशा परिस्थितीमध्ये लाजमी सरपंच कशा झाल्या यावरुन प्रश्न उपस्थित केले जात आहे. या प्रकरणामध्ये कोलकाता हायकोर्टामध्ये उपविभागीय अधिकाऱ्यांनी एक अहवालही सादर केला आहे.

कोर्टात याचिका

रेहाना सुल्तान यांनी 2024 साली कोलकात्यामधील उच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल केली होती. रेहाना यांनी 2022 साली ग्रामपंचायत निवडणूक लढवली होती. या निवडणुकीमध्ये त्यांचा लवली खातून यांच्याकडून पराभव झाला होता. सुल्ताना यांचे वकील अमलान भादुडी यांनी त्यांची बाजू मांडताना, "याचिका दाखल करणाऱ्या रेहाना सुल्ताना यांनी तृणमूलच्या उमेदवार म्हणून निवडणूक लढली. मात्र त्या लवली खातून यांच्याकडून पराभूत झाल्या. त्यावेळेस लवली यांनी काँग्रेस आणि डाव्या पक्षांकडून उमेदवार म्हणून ही निवडणूक लढून जिंकली. मात्र निवडणूक जिंकल्यानंतर एक ते दोन महिन्यामध्ये लवली खातून यांनी तृणमूलमध्ये प्रवेश केला," असं कोर्टाला सांगितल.

खरं नाव काय?

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, लवली खातूनचं खरं नाव नासिया शेख असून त्यांनी पासपोर्टशिवाय भारतात बेकायदेशीरपणे प्रवेश केला आहे. 2015 मध्ये लवली खातून यांना आधारकार्ड देण्यात आलं. त्यानंतर आधारकार्डच्या आधारावर त्यांना 2018 मध्ये बनावट जन्माचा दाखला देण्यात आला. मात्र सर्व कागदपत्रं ही खोट्या माहिती आणि पुराव्यांच्या आधारे बनवण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. याचिकाकर्त्यांनी केलेला दावा सिद्ध करण्यासाठी सर्व कागदपत्रं ही खोट्या माहितीच्या आधारे बनवण्यात आल्याचं काही कागदपत्रं दाखवत कोर्टात सांगितलं. 

शेजराच्या गावात गेल्या अन्...

रेहाना यांच्या वकिलाने, "आम्ही स्थानिक पोलीस स्टेशन आणि स्थानिक प्रशासनाकडे यासंदर्भात तक्रार केली. मात्र कोणतीही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे आम्ही 2024 कोलकाता उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली," असंही सांगितलं. आपण ओबीसी असल्याचं प्रमाणपत्र, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र अशा सर्वच कागदपत्रांमध्ये लवली खातून यांनी फेरफार केल्याचा आरोप रेहानाच्या वकिलांनी केला आहे. आम्हाला स्थानिकांकडून असंही कळलं की खातून एका शेजारच्या गावात गेल्या होत्या आणि त्यांनी एका स्थानिकाला आपणच खातून यांचे वडील असल्याचं सांगण्यास सांगितल्याचा दावाही रेहाना यांच्या वकिलाने केला आहे. खातून यांच्या वडिलांचं नाव शेख मुस्तफा नाही तर जमील बिस्वास आहे. राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी म्हणजेच एनआरसीमध्ये शेख मुस्तफा यांच्या कुटुंबामध्ये लवली यांचा उल्लेख नाही, हे सुद्धा रेहाना यांच्या वकिलाने कोर्टात सांगितलं.

बनावट पासपोर्ट बनवणारी टोळी अटकेत

भारतात खोट्या कागदपत्रांच्या आधारे बांगलादेशी व्यक्ती घुसखोरी करत असतानाचा हे गंभीर प्रकरण समोर आलं आहे. काही दिवसांपूर्वीच खोट्या पासपोर्ट बनवून देणाऱ्या सात जणांच्या टोळीला पोलिसांनी अटक केली होती. बांगलादेशमधून बेकायदेशीररित्या भारतात घुसण्यासाठी ही टोळी बांगलादेशी लोकांना मदत करायची.