Independence Day 2023 निमित्तानं Google सजलं; पाहा कोणाला समर्पित आहे आजचं Doodle

Independence Day 2023 : स्वातंत्र्य दिनानिमित्तानं संपूर्ण देशभरात सध्या उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत असून, गुगलही त्यात मागे राहिलेलं नाही. या खास दिवसासाठी गुगलकडून तितकंच खास डूडलही साकारण्यात आलं आहे. (Google Doodle)

सायली पाटील | Updated: Aug 15, 2023, 06:33 AM IST
Independence Day 2023 निमित्तानं Google सजलं; पाहा कोणाला समर्पित आहे आजचं Doodle  title=
Independence Day 2023 Google doodle by namrata kumar salutes textile industry

Independence Day 2023 : भारताला स्वातंत्र्य मिळून इतकी वर्षे उलटली, हा देश सर्वार्थानं पुढे आला. जागतिक स्तरावर प्रत्येक क्षेत्रामध्ये या देशानं प्रगती केली. अशा या बलसागर भारताचा आज 77 वा स्वातंत्र्य दिन. या दिवसाच्या निमित्तानं गल्लीपासून दिल्लीपर्यंत प्रत्येक ठिकाणी देशाचे नागरिक आपल्या परिनं देशाप्रती असणारी कृतज्ञतेची भावना व्यक्त करत आहेत. स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना अभिवादन करत आहेत. सानथोर सर्वांचीच यासाठी लगबग आहे. अगदी खुद्द गुगलही यामध्ये मागे राहिलेलं नाही. 

भारताच्या स्वातंत्र्यदिनाचं औचित्य साधत Google कडून एक खास भेट देण्यात आली आहे. ही भेट म्हणजे Google Doodle ची. 15 ऑगस्टच्या निमित्तानं गुगल सर्चमध्ये गेल्यास इथं तुम्हाला विविध प्रकारचे कापड आणि त्यावर गुगल लिहिलेली एक कलाकृती पाहायला मिळेल. हे डूडल तयार केलं आहे नवी दिल्लीच्या नम्रता कुमारनं. विविध प्रकारची वस्त्र, त्यांचे प्रकार आणि त्यांची वैशिष्ट्य तिनं या कलाकृतीच्या माध्यमातून टीपली आहेत. 

कशी मिळाली प्रेरणा? 

डूडल नेमकं कसं साकारलं हे सांगताना नम्रतानं दिलेल्या माहितीनुसार तिनं सर्वप्रथम भारतात अस्तित्वात असणाऱ्या वस्त्रोद्योग आणि हस्तकला प्रकारांची माहिती मिळवली. ज्यांतर एम्ब्रॉयडरी, एनकम्पासिंग, विविध प्रकारची विणकामं, छापकाम, डाय तंत्र, हातानं कापडावर चित्र रेखाटण्याची कला, या अशा प्रकारांची माहिती मिळवली आणि त्यांचं प्रतिबिंब या डूडलमध्ये साकारलं. देशाच्या भौगोलिक रचनेलाही हे डूडल न्याय देईल असाच तिचा प्रयत्न होता.