लाल किल्ल्यावरुन मोदींकडून मणिपूर हिंसाचाराचा उल्लेख! म्हणाले, 'आया-बहिणींच्या सन्मानाशी...'

PM Modi Independence Day Speech: मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावरुन पावसाळी अधिवेशनामध्येही चांगलाच गोंधळ झाल्याचं पहायला मिळालं होतं. मात्र याच मुद्द्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणामध्ये थेट लाल किल्ल्यावरुन भाष्य केलं आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Aug 15, 2023, 09:15 AM IST
लाल किल्ल्यावरुन मोदींकडून मणिपूर हिंसाचाराचा उल्लेख! म्हणाले, 'आया-बहिणींच्या सन्मानाशी...' title=
लाल किल्ल्यावरील भाषणामधून पंतप्रधान मोदींचं विधान

PM Modi Independence Day Speech: स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरुन देशाला उद्देशून केलेल्या भाषणामध्ये मणिपूरमधील हिंसाचाराचा उल्लेख केला. पंतप्रधान मोदींनी मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्याचं आवाहन तेथील नागरिकांना केलं. तसेच संपूर्ण देश तुमच्यासोबत आहे असा विश्वास मोदींनी मणिपूरमधील नागरिकांना दिला. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून मणिपूरमध्ये हिंसाचार सुरु आहे. जुलै महिन्यामध्ये येथील महिलांची नग्नावस्थेत धिंड काढल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आल्यानंतर देशभरामध्ये या हिंसाचारासंदर्भात संताप व्यक्त करण्यात आला. लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनामध्येही मणिपूरचा मुद्दा चांगलाच गाजला. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने मोदींना आणि केंद्रातील भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील सरकारला लक्ष्य केलं. आज याच मुद्यावर पंतप्रधान मोदींनी थेट लाल किल्ल्यावरील भाषणातून उल्लेख केला.

या वर्षाचं महत्त्व सांगितलं

पंतप्रधान मोदींच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर मोदींनी देशाला उद्देशून भाषण केलं. "मी आज देशाच्या स्वातंत्र्यांच्या लढ्यामध्ये ज्यांनी योगदान दिलं, बलिदान दिलं, तपस्या केली त्या सर्वांना मी आदरपूर्वक नमक करतो. आज अरबिंदो यांची 150 वी जयंती या वर्षी पूर्ण होत आहे. हे वर्ष स्वामी दयानंद सरस्वतींच्या 150 व्या जयंतीचं वर्ष आहे. राणी दुर्गावतीच्या 500 व्या जन्मतिथीचं वर्ष आहे. हा फार पवित्र योग असून फार उत्साहात तो साजरा केला जाईल. मीराबाई यांच्या 525 वी जन्मतिथीही या वर्षी आहे. या वर्षी आपल्या आपण 26 जानेवारी साजरा करु तो 75 वा असेल. अनेक अर्थांनी अनेक संधी, अनेक शक्यता, नवीन प्रेरणा आपल्याला मिळणार आहे," असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

नैसर्गिक आपत्तींचा उल्लेख

यानंतर पंतप्रधानांनी वर्षभरामध्ये देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये आलेल्या नैसर्गिक आपत्तींचा उल्लेख केला. "माझ्या प्रिय कुटुंबियांनो नैसर्गिक आपत्ती देशातील अनेक भागांमध्ये दिसून आल्या. ज्यांना या नैसर्गिक आपत्तींचा फटका बसला त्या कुटुबांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. राज्य आणि केंद्र सरकार मिळून त्या सर्व संकटांवर मात करुन पुढे जाऊ असा विश्वास व्यक्त करतो," असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

मणिपूर हिंसाचारावर भाष्य

पंतप्रधान मोदींनी मणिपूर हिंसाचाराचा उल्लेख करताना, "मागील काही आठवड्यांपासून ईशान्य भारतामाध्ये खास करुन मणिपूरमध्ये आणि भारतामधील इतर भागांमध्ये हिंसाचार झाला. खास करुन मणिपूरमध्ये हिंसाचार घडला. अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. आया-बहिणींच्या सन्मानाशी छेडछाड करण्यात आली. मात्र काही दिवसांपासून सतत शांतता प्रस्थापित होत असल्याच्या बातम्या समोर आल्या. देश मणिपूरमधील लोकांबरोबर आहे. मणिपूरच्या लोकांनी मागील काही दिवसांपासून जशी शांतता टिकवून ठेवली आहे तशीच टिकवून ठेवावी. शांततेमधूनच मार्ग सापडेल आणि राज्य आणि केंद्र सरकार समस्यांच्या समधानासाठी अनेक प्रयत्न करत आहे. पुढेही करत राहील," असा शब्द देशातील जनतेला दिला.

भारत गुलामगिरीमध्ये ढकलला गेला

"आपण इतिहासाकडे पाहतो तेव्हा असे काही क्षण दिसतात जे कायमचा प्रभाव सोडून जातात. त्याचा प्रभाव फार दिर्घकाळ राहतो. सुरुवातीला ती छोटी घटना वाटते मात्र नंतर ती घटना अनेक समस्यांचं मूळ ठरते. हजार-1200 वर्षांपूर्वी एका राजाचा पराभव झाला तेव्हा वाटलं पण नव्हतं की भारत हजारो वर्षांसाठी गुलामीमध्ये ढकलला जाईल. कोणीही येऊन आपल्याला लूटून जायचं. मात्र आता परिस्थिती फार बदलली आहे," असंही पंतप्रधान मोदी म्हणाले.