Independence Day 2024 PM Modi Speech : भारताच्या 78 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावर आयोजित ध्वजारोहण सोहळ्यात सहभागी झाले होते. पंतप्रधनांच्या हस्ते या ऐतिहासिक वास्तूवर ध्वजारोहण सोहळा पार पडल्यानंतर त्यांनी देशवासियांना संबोधित केलं. विविध मुद्द्यांना यावेळी त्यांनी आपल्या संबोधनपर भाषणादरम्यान अधोरेखित केलं आणि यामध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या मुद्द्यावर बोलताना मात्र पंतप्रधनांनी तीव्र संताप व्यक्त केला.
एकिकडे महिलांच्या सबलीकरणाची भाषा असतानाच दुसरीकडे महिलांवर होणाऱ्या अत्याचारांविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. गुन्हेगारांना शिक्षा होऊन या शिक्षेचीही व्यापक चर्चा झालीच पाहिजे जेणेकरून या प्रवृत्तीच्या नराधमांच्या मनात भीती निर्माण होईल, असं ते संतप्त स्वरात म्हणाले. (PM Modi express anger over atrocities and crime against women)
#WATCH | PM Narendra Modi says, "...I would like to express my pain once again, from the Red Fort today. As a society, we will have to think seriously about the atrocities against women that are happening - there is outrage against this in the country. I can feel this outrage.… pic.twitter.com/2gQ53VrsGk
— ANI (@ANI) August 15, 2024
पीएम मोदींनी लाल किल्ल्यावरून राक्षसी प्रवृत्तीवर टीकेची झोड उठवत म्हटलं, 'आज महिलांच्या निर्णयक्षमतेपासून त्यांच्या कर्तृत्त्वाविषयीची उल्लेखनीय कामगिरी आपण पाहत आहोत. पण, असं असतानाच काही चिंताजनक वृत्तही समोर येत आहेत. मी या वास्तूवरून त्याबाबत खंत व्यक्त करू इच्छितो.
एक समाज म्हणून आपण गांभीर्यानं विचार केला पाहिजे. आपल्या आई, बहिणींवर अत्याचार होत आहेत. त्याप्रती देशात, जनसामान्यांत आक्रोश असून हा संताप मीसुद्धा पाहतोय. आता या आक्रोशाकडे देशानं, समाजानं आणि राज्य शासनांनं गांभीर्यानं पाहावं. महिलांविरोधातील अपराधांची तातडीनं चौकशी व्हावी, राक्षसी कृत्य करणार्यांना लवकरात लवकर कठोर शिक्षा केली जाणं हे समाजात विश्वास निर्माण करण्यासाठी अतिशय महत्त्वाचं आणि गरजेचं आहे.
बलात्कार किंवा महिलांवरील अत्याचारांची बरीच चर्चा होते पण गुन्हेगारांना शिक्षा होते तेव्हा मात्र त्याची चर्चा होत नाही. पण, आता ही काळाजी गरज आहे की ज्यांना शिक्षा होतेय त्याची व्यापक चर्चा झालीच पाहिजे. कारण, हे पाप करणाऱ्यांच्या मनातही भीती बसली पाहिजे की हे पाप करणाची अशी अवस्था होते की फासावर चढावं लागतं. मला असं वाटतं की ही भीती निर्माण केली गेलीच पाहिजे.'