नवी दिल्ली : जगभरात 2018 या वर्षात स्मार्टफोन विक्रीत मोठी घसरण झाली असल्याचे अनेक अहवालांतून समोर आले आहे. परंतु भारतात 2018 वर्षात स्मार्टफोनच्या विक्रीत वाढ झाली आहे. सर्वात स्वस्त इंटरनेट डेटा हे भारतात स्मार्टफोनच्या विक्रीत वाढ होण्याचे सर्वात महत्त्वाचे कारण आहे. देशात सध्या 1 जीबी मोबाईल इंटरनेटची किंमत 18.5 रूपये आहे तर जगभरात ही किंमत जवळपास 600 रूपये आहे. डॉट यूके या इंटरनेट डेटाच्या किंमतींची तुलना करणाऱ्या शोध कंपनीकडून ही आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे.
कंपनीने दिलेल्या अहवालनुसार, देशात 1 जीबी डेटाची किंमत 18.5 रूपये, ब्रिटेनमध्ये ही किंमत जवळपास 470 रूपये तर अमेरिकेत 875 रूपये किंमत आहे. 230 देशांमधील मोबाईल इंटरनेटच्या किंमतीचे आकलन करून ही आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. जगभरात 1 जीबी मोबाईल इंटरनेट डेटाची साधारण किंमत 630 रूपये इतकी आहे. भारतात 43 कोटी स्मार्टफोन वापरकर्ते असून चीननंतर भारताचा सर्वात मोठा दुसऱ्या क्रमांकाचा स्मार्टफोन बाजार आहे.
भारतात इंटरनेटचे दर सर्वात कमी असले तरी भारताचा शेजारी देश चीनमध्ये मोबाईल इंटरनेट वापरासाठी 698 रूपये मोजावे लागतात. दक्षिण कोरियामध्ये 1 जीबी मोबाईल डेटाची किंमत जवळपास 1067 रूपये इतकी आहे. जिम्बाब्वेमध्ये सर्वाधिक मोबाईल इंटरनेटची किंमत असून 1 जीबी डेटासाठी 5,312 रूपये मोजावे लागतात. भारतातनंतर सर्वात स्वस्त इंटरनेट किर्गिस्तानमध्ये आहे. किर्गिस्तानमध्ये 1 जीबी डेटासाठी 19 रूपये मोजावे लागतात. तर कजाकिस्तानमध्ये जवळपास 34 रूपये द्यावे लागतात.
भारतात रिलायन्स जियोच्या येण्याआधी इंटरनेट सुविधा महाग होती. 5 सप्टेंबर 2016 साली भारतीय बाजारात रिलायन्स जियोने आपली सेवा सुरू केली. त्यानंतर इंटरनेटच्या दरात मोठी घट झाली. बाजारात जिओला टक्कर देण्यासाठी इतर मोबाईल कंपन्यांनाही आपल्या इंटरनेट डेटा प्लॅनचे दर कमी करावे लागले.