इसिस भारतावर हल्ला करण्याच्या तयारीत, अमेरिकेकडून अलर्ट

 इस्लामिक स्टेटच्या खुरासान ग्रुपनेच गेल्यावर्षी भारतावर आत्मघाती हल्ला करण्याचा प्रयत्न केला

Updated: Nov 6, 2019, 03:02 PM IST
इसिस भारतावर हल्ला करण्याच्या तयारीत, अमेरिकेकडून अलर्ट title=

नवी दिल्ली : आयसिसचा म्होरक्या अबू बक्र अल बगदादीला अमेरिकेच्या विशेष पथकाने काही दिवसांपूर्वी ठार मारले. परंतु या घटनेनंतर अद्यापही भारतावरील संकट मात्र टळलेलं नाही. भारत देश इस्लामिक स्टेटच्या निशाण्यावर असल्याचा दावा अमेरिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून करण्यात आला आहे. अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार इस्लामिक स्टेटच्या खुरासान ग्रुपनेच गेल्यावर्षी भारतावर आत्मघाती हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता.   

अमेरिकन सिनेटमध्ये यासंदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. या प्रश्नाला उत्तर देताना अमेरिकेच्या राष्ट्रीय दहशतवादविरोधी केंद्राचे कार्यकारी संचालक राशेल ट्रॅव्हर्स यांनी म्हटले की, 'आयसिसच्या खुरासान ग्रुप म्हणजेच ISIS-K ने गतवर्षी भारत देशावर आत्मघाती हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. आयसिसच्या सर्व दहशतवादी संघटनांपैकी ISIS-K अमेरिकेसाठी सर्वात जास्त चिंतेची बाब आहे.'

अमेरिकन सिनेटर मॅगी हसनच्या प्रश्नांवर राशेल ट्रॅव्हर्स यांनी वरील माहिती दिली आहे. त्याचप्रमाणे ISIS-Kया ग्रुपमध्ये तब्बल ४ हजारांपेक्षा जास्त लोक सामील असल्याचे त्यांनी सांगीतले आहे.