Masjid Madrasa BJP Campaign : लोकसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली असून सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. देशातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपनेही (BJP) निवडणुकीसाठी नवी रणनिती आखली आहे. लोकसभा निवडणुकीत मुस्लीम मतांना (Muslim Voters) आकर्षित करण्यासाठी भाजपने एक प्लान तयार केला आहे. या प्लान नुसार मशीदी आणि मदरशांमध्येही ( Masjid and Madrasa) निवडणूक प्रचार केला जाणार आहे. विशेष म्हणजे यासाठी उर्दू (Urdu) आणि अरबी (Arabic) भाषेत प्रचार केला जाणार आहे. मोदी सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपकडून मजार, मशीद आणि मशीदींचा आधार घेतला जात आहे. या अभियानाची सुरुवात उत्तर प्रदेशमधल्या लखनऊपासून करण्यात आली आहे.
मुस्लीम मतांसाठी अभियान
भाजपच्या अल्पसंख्यक मोर्चाने दरगाह हजरत कासिम शाहिदपासून या अभियानाची सुरुवात केली. यावेळी उर्दू भाषेतील 'मन की बात' पुस्तकाचं वितरण करण्यात आलं. या अभियानामुळे मुस्लिम समाजात भाजपची पोहोच वाढेल, तसंच मोदी सरकारच्या योजनांची त्यांना माहितीही मिळेल असं पक्षाला वाटतंय. लोकसभा निवडणूक 2024 मध्ये याचा फायदा होईल असा विश्वासही भाजपला आहे.
मोदी सरकारच्या योजनांची माहिती
मोदी सरकारने केलेल्या कामांची माहिती तळागाळपासून श्रीमंत व्यक्तीपर्यंत, ग्रामीण भागापासून शहरी भागापर्यंत आणि प्रत्येक जाती-धर्मातली लोकांपर्यंत पोहोचावी असा भाजपचा प्रयत्न आहे. मुस्लीम समाजाला या योजना कळाव्यात यासाठी उर्दू आणि अरबी भाषेत प्रचार केला जाणार आहे. मुस्लिम समाजासाठी केलेल्या कामांचाही यात उल्लेख केला जाणार आहे. मन की बात कार्यक्रमांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी मुस्लिम समाजातही तितकच लोकप्रिय असल्याचा विश्वास भाजप नेत्यांना आहे.
भाजपाचं पहिल्यांदाच असं अभियान
मुस्लिम मतांना आकर्षित करण्यासाठी भाजपने पहिल्यांदाच अशा प्रकारचं अभियान सुरु केलं आहे. या अभियानामुळे लोकसभा निवडणूकीत भाजपाचा मतांचा टक्का वाढण्यास मदत होणार आहे. या अभियानाची सुरुवात उत्तर प्रदेशमधून करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशमध्ये लोकसभेच्या सर्वाधिक 80 जागा आहेत. 2019 लोकसभा निवडणुकीत भाजप 62, अपना दल 2, बसपा 10 आणि सपाला 5 जागा मिळाल्या होत्या. तर काँग्रेसला केवळ एका जागेवर समाधान मानावं लागलं होतं. यावेळी भाजपने उत्तर प्रदेशमध्ये पूर्ण 80 जागांचं लक्ष्य ठेवलं आहे.
काँग्रेस-सपा एकत्र
दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस आणि समाजवादी पक्षानेही तयारी सुरु केली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या युतीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशमध्ये लोकसभेच्या 80 जागांपैकी काँग्रेस 17 तर समाजवादी पक्ष 63 जागांवर निवडणूक लढवणार आहे.