देशातील पहिल्या महिला कार्डिओलॉजिस्टचं कोरोना संसर्गामुळे निधन

मागील ११ दिवसांपासून त्यांच्यावर एनएचआय येथे उपचार सुरु होते. 

Updated: Aug 31, 2020, 01:19 PM IST
देशातील पहिल्या महिला कार्डिओलॉजिस्टचं कोरोना संसर्गामुळे निधन  title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : देशातील पहिल्या महिला कार्डिओलॉजिस्ट डॉ. शिवरामकृष्ण अय्यर पद्मावती Dr Sivaramakrishna Iyer Padmavati यांचं coronavirus कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळं निधन झालं. त्या १०३ वर्षांच्या होत्या. नॅशनल हार्ट इन्स्टीट्यूट अर्थात 'एनएचआय' यांच्यातर्फे याबाबतची माहिती देण्यात आली. मागील ११ दिवसांपासून त्यांच्यावर एनएचआय येथे उपचार सुरु होते. 

एका अधिकृत पत्रकाद्वारे एनएचआयकडून डॉ. पद्मावती यांच्या निधनाची माहिती देण्यात आली. 'देशाच्या पहिल्या महिला कार्डिओलॉजिस्ट डॉ. एस पद्मावती यांचं कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळं २९ ऑगस्ट रोजी निधन झालं', असं या पत्रकात म्हटलं गेलं होतं. 

अधिकृत माहितीनुसार कोरोना संसर्गामुळं त्यांना श्वास घेण्यास अडचण येत होती. शरीरात ताप असल्यामुळं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. ज्यानंतर त्यांच्या दोन्ही फुफ्फुसांमध्ये न्युमोनियाचा संसर्गही झाला. यातच हृदयविकाराचा झटका आल्यामुळं त्यांचं निधन झालं. 

 

रविवारी पंजाबी बाग येथील कोविड 19 रुग्णांवर केल्या जाणाऱ्या अंत्यस्कारांच्या स्थळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. केंद्रीय गृह मंत्रालयानं आखून दिलेल्या नियमावलीमुसार यावेळी अंत्यदर्शनासाठी फार कमी संख्येने लोक उपस्थित होते. डॉ. शिवरामकृष्ण अय्यर पद्मावती यांचा जन्म म्यानमारमध्ये झाला होता. पण, दुसऱ्या विश्वयुद्धादरम्यान जपानच्या आक्रमणानंतर त्या भारतात आल्या आणि इथं येऊन त्यांनी देशातील पहिल्या महिला कार्डिओलॉजिस्ट होण्याचा बहुमान मिळवला.