एअर स्ट्राईक: परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक

भारताचं पाकिस्तानला सडेतोड उत्तर

Updated: Feb 26, 2019, 12:56 PM IST
एअर स्ट्राईक: परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक title=

नवी दिल्ली : भारतीय हवाईदलाने पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये जाऊन दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर जोरदार हल्ला केला आहे. पाकिस्तानाच्या सीमाभागातील अनेक दहशतवाद्यांचे कॅम्प यामध्ये उद्धवस्त करण्यात आले आहेत. मंगळवारी पहाटे 3.30 वाजता भारताने ही कारवाई केली. भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना या संपूर्ण कारवाईची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली आहे. त्यानंतर पंतप्रधान मोदी आणि सीसीएसची बैठक झाली. गृहमंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री अरुण जेटली आणि संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण या बैठकीला उपस्थित होते. त्यानंतर आता संध्याकाळी ५ वाजता भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीत सगळ्या पक्षाच्या नेत्यांना या कारवाईची माहिती दिली जाऊ शकते.

भारताचे अर्थमंत्री अरुण जेटली थोड्याच वेळात सरकारकडून देशाला भारतीय वायुदलाने केलेल्या या कारवाईची माहिती देणार आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती वेंकैया नायडू यांना या कारवाईची संपूर्ण माहिती दिली.

भारतीय हवाई दलाने केलेल्या या कारवाईनंतर सीमाभागावर हायअलर्ट आहे. पाकिस्तानकडून यावर कधीही प्रतिक्रिया येऊ शकते. त्यामुळे लष्कर प्रमुख बिपीन रावत आणि हवाईदल प्रमुख बी एस धनोआ हे यावर नजर ठेवून आहेत. भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना सीमेवरील परिस्थितीची माहिती देण्यात आली आहे.