कोरोना संकटात सापडलेल्या जगाला भारत देणार संजीवनी

२५ हून अधिक देशांना भारताकडून औषध पुरवठा

Updated: Apr 10, 2020, 03:08 PM IST
कोरोना संकटात सापडलेल्या जगाला भारत देणार संजीवनी title=

ब्युरो रिपोर्ट :  संपूर्ण जगावर कोरोनाचं संकट आलं आहे आणि सर्वशक्तिमान वाटणारे देशही हतबल झाले आहेत. कोरोनापुढे वैद्यकीय यंत्रणा आणि साहित्य अपुरं पडत असताना भारताकडे हायड्रोक्लोरोक्वइनसह अन्य औषधांची मागणीही वाढली आहे. अमेरिकेसह तब्बल २५ हून अधिक देशांनी भारताकडे औषधांची मागणी केली आहे.

हायड्रोक्लोरोक्वइन औषधांसाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या भूमिकेची खूप चर्चा झाली. अमेरिकेसारखा शक्तिमान देशही यासाठी भारतावर किती अवलंबून आहे हेदेखिल या निमित्तानं दिसलं. ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे त्यासाठी आभारही मानले.

पण केवळ अमेरिकाच नव्हे तर अन्य देशांच्या प्रमुखांनीही या औषधाची मागणी केली आहे. ब्राझिलचे राष्ट्रध्यक्ष बॉल्सनॉरो यांनी तर पंतप्रधान मोदी यांनी पाठवलेल्या औषधांची तुलना हनुमानाच्या संजीवनी जडीबुटीबरोबर केली आणि मोदी यांना धन्यवाद दिले.

श्रीलंकेचे पंतप्रधान महिंद्रा राजेपक्षे यांनीही फोटो ट्वीट करून पंतप्रधान मोदींना धन्यवाद दिले होते. याशिवाय इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन न्येतन्याहू यांनी भारतानं पाठवलेल्या औषधांबद्दल पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले.

 

याशिवाय भारताचे शेजारी देश आणि जगभरातले अन्य छोटे-मोठे देशही औषधं आणि अन्य वैद्यकीय साहित्यासाठी भारतावर अवलंबून आहेत. भारतही या देशांना शक्य तेवढी मदत करत आहे. विशेषतः हायड्रोक्लोरोक्वइन औषधासाठी अनेक देश भारतावर अवलंबून आहेत.