कोरोना चाचणी करणाऱ्या खासगी लॅब्ससाठी महत्वाच्या सूचना

इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) खासगी लॅबला कोरोना रुग्ण तपासणीसाठी निर्देश जारी केले 

Updated: Mar 22, 2020, 07:35 AM IST
कोरोना चाचणी करणाऱ्या खासगी लॅब्ससाठी महत्वाच्या सूचना title=

नवी दिल्ली : जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. देशात याची संख्या वाढताना दिसत आहे. यावर आळा बसण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर भारतात आज जनता कर्फ्यू सुरु झाला आहे. दरम्यान भीतीचे वातावरण पसरल्याने कोरोनाची चाचणी करण्यासाठी अनेकजण लॅबच्या बाहेर रांगा लावत आहेत. या चाचणी दरम्यान जनतेची आर्थिकदृष्ट्या फसवणूक टाळण्यासाठी तसेच अधिक सुरक्षित तपासणी होण्यासाठी इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) खासगी लॅबला कोरोना रुग्ण तपासणीसाठी निर्देश जारी केले आहेत. यानुसार कोरोना तपासणीसाठी आलेल्या रुग्णाकडून ४ हजार ५०० रुपयांपर्यंतच रक्कम आकारली जावी. यामध्ये स्क्रीनिंग टेस्टसाठी १,५०० तर इतर अतिरिक्त चार्जचे ३,५०० रुपयाचा समावेश असावा असे सांगण्यात आले आहे. 

शरीरातील तापमान ३८ अंशाहून अधिक वाढणे, सर्दी-खोकला अशी या आजाराची लक्षणे आहेत. यापैकी काही जाणवू लागले तरी रुग्ण आता थेट लॅब गाठत आहेत. त्यामुळे लॅबवर ताण पडतोय. यासाठी आयसीएमआरने निर्देश दिले आहेत. सॅम्पल कलेक्शन आणि टेस्टिंगसाठी देखील सुचना केल्या आहेत. कोरोना संशयित रुग्णांचे स्वतंत्ररित्या घेण्यात यावे असे यात म्हटले आहे. अधिकृत वैद्यकिय अधिकाऱ्याच्या सल्ल्यानंतरच रुग्णाची कोरोनाची तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

कोरोना संशयितांचे सॅम्पल घरी जाऊन घ्यावे. त्यामुळे त्यांच्या प्रवासादरम्यान इतरांना त्याची लागण होण्याची शक्यता कमी असेल. कोरोना चाचणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना योग्य ती ट्रेनिंग देणे गरजेचे आहे. संशयित रुग्णाची चाचणी करताना त्याच्याकडून वास्तव्याचा सरकारी पुरावा घ्यावा असे देखील या निर्देशांमध्ये म्हटले आहे.