Indian Railway : रेल्वेनं प्रवास करताना काही गोष्टींची विशेष काळजी घेण्याचा अनेक प्रवाशांचा स्वभाव. कैक मंडळी प्रवासाला निघताना खाण्यापिण्याची सोय करूनच निघतात. पण, मागील काही वर्षांमध्ये रेल्वे प्रवासात Indian Railways कडून नाश्त्यापासून जेवणापर्यंतच्याही सुविधा देण्यात येत असल्यामुळं अनेकांनीच या सुविधेला प्राधान्य दिल्याचंही पाहायला मिळतं. सर्वांसाठीच हा अनुभव सुखद असतो असं नाही.
दिल्लीतील एका प्रवाशाचा अनुभव आणि त्याची X पोस्ट पाहता हेच लक्षात येत आहे. अर्यांश सिंह असं या प्रवाशाचं नाव. IRCTC VIP Executive Lounge मध्ये जेवताना त्याचा एक अशी बाब लक्षात आली, जी पाहून त्याला तर किळस वाटलीच. पण, जेव्हा त्यानं हा फोटो शेअर केला तेव्हा PHOTO पाहून नेटकरीसुद्धा हैराण झाले.
रेल्वेच्या खाण्याची गुणवत्ता मागील काही वर्षांमध्ये खरंच फार बदललीये... असा टोला या प्रवाशानं लगावला आणि रेल्वेच्या आहाराविषयीच्या एका ट्विटकडे त्यानं लक्ष वेधलं. 'हो अगदीच रेल्वेमध्ये मिळणाऱ्या खाद्यपदार्थांचा दर्जा सुधारतोय... आता ते प्रोटीनयुक्त रायता देऊ लागलेयत', असा उपरोधिक टोला या युजरनं लगावला आणि त्याच्या पोस्टवर नेटकरी व्यक्त होऊ लागले. रायत्याच्या ग्लासमध्ये तरंगणारा किडा पाहून तो हैराणच झाला.
Yes, for sure, Indian Railway food quality has improved, now they are serving raita with more protein. https://t.co/YKtUQt7roZ pic.twitter.com/FpJVIKOhBC
— Aaraynsh (@aaraynsh) October 21, 2024
रेल्वेच्या व्हिआयपी लाऊन्जमध्ये हे असे प्रकार घडत आहेत, मग विचार करा दैनंदिन रेल्वे सेवांमध्ये आणि त्यांच्या पॅन्ट्री कारमध्ये कोणत्या दर्जाचं जेवण दिलं जात असेल? असं त्या प्रवाशानं लिहित एका नव्या चर्चोला तोंड फोडलं. रेल्वेच्या वतीनं दिल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांमध्ये किडे, मुंग्या, झुरळ यापूर्वीही सापडले असून, सातत्यानं आहाराचा, खाद्यपदार्थांचा दर्जा आणि प्रवाशांना मिळणाऱ्या सुविधा याविषयी प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. यावर आता पुन्हा एकदा रेल्वे विभागाकडून दिलगिरी व्यक्त करण्यात आली. पण, परिस्थिती केव्हा सुधारणार? हाच प्रश्न नेटकरी आणि प्रवासी विचारू लागले आहेत.