तीन लाख रेल्वे कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर येणार गदा?

आपलं काम व्यवस्थितपणे पूर्ण न करणाऱ्यांविरोधात कारवाई करत त्यांना वेळेपूर्वीच निवृत्त केलं जाणार?

Updated: Jul 30, 2019, 02:34 PM IST
तीन लाख रेल्वे कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर येणार गदा?

नवी दिल्ली : भारतीय रेल्वे तीन लाख कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याच्या तयारीत आहे. रेल्वेकडून ५५ वर्ष किंवा त्याहून जास्त वय असणाऱ्या कर्मचाऱ्यांना कमी केलं जाऊ शकतं. रेल्वे बोर्डानं सर्व रेल्वे झोन प्रमुखांना पत्र लिहून सर्व झोनच्या कर्मचाऱ्यांच्या कामाची पडताळणी करण्याचे आदेश दिलेत. मंत्रालयाच्या सर्व विभाग व्यवस्थापकांना ५५ वर्ष किंवा त्याहून अधिक वय असणाऱ्या कर्मचाऱ्यांची एक यादी तयार करण्याचे आदेश देण्यात आलेत. इतकंच नाही, तर ज्या कर्मचाऱ्यांचे २०२० च्या पहिल्या तिमाहीपर्यंत रेल्वेतील नोकरीचे ३० वर्ष पूर्ण होत आहेत, अशाही कर्मचाऱ्यांची यादी तयार करण्याचे आदेश मंत्रालयाकडून देण्यात आलेत. 

रेल्वे बोर्डानं सर्व विभाग व्यवस्थापकांना (zonal manager) कर्मचाऱ्यांच्या कामाची पडताळणी (Performance review) करून त्यांचा सर्व्हिस रेकॉर्ड तयार करण्याचे आदेश दिलेत. या याद्या ९ ऑगस्टपर्यंत पाठवण्यास सांगण्यात आलंय. 

तीन लाख कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करून कर्मचाऱ्यांची संख्या १३ लाखांहून १० लाखांपर्यंत आणण्याचा रेल्वे बोर्डाचा विचार सुरू आहे. 

कामाच्या पडताळणीत सर्व झोन कर्मचाऱ्यांच्या शारीरिक, मानसिक फिटनेससोबतच रोजच्या कामावर येण्याच्या वेळा आणि नियम पाळण्यांबद्दल रिपोर्ट पाठवण्याच्या सूचना देण्यात आल्यात. 

रेल्वेशी निगडीत सूत्रांच्या माहितीनुसार, हा वेळोवेळी केला जाणारा रिव्ह्यू आहे... यानुसार आपलं काम व्यवस्थितपणे पूर्ण न करणाऱ्यांविरोधात कारवाई करत त्यांना वेळेपूर्वीच निवृत्त केलं जातं. अशा पद्धतीची कारवाई करण्यासाठी सरकारनं कठोर भूमिका घेतलीय.