AC कोचमधून प्रवास करणाऱ्यांसाठी रेल्वेची नवी सुविधा

रेल्वेच्या एसी कोचमधून प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.

Updated: Jun 27, 2018, 02:25 PM IST
AC कोचमधून प्रवास करणाऱ्यांसाठी रेल्वेची नवी सुविधा title=

नवी दिल्ली : रेल्वेच्या एसी कोचमधून प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वेकडून प्रवाशांच्या सुविधांवर विशेष लक्ष दिले जाणार आहे. यासाठी गेल्या काही दिवसांपासून अनेक बदल केले जात आहेत. २०१७ मध्ये आलेल्या कॅग रिपोर्टमध्ये रेल्वेतील त्रुटींवर टीका करण्यात आली आहे. या रिपोर्टमधून निकृष्ट दर्जाच्या जेवणासोबतच ब्लॅंकेट खराब असल्याची बाब समोर आली आहे. प्रवासात खराब ब्लॅंकेट्सचा वापर त्रासदायक ठरतो.

सहा महिन्यांपासून ब्लॅंकेट्स धुतलेले नाहीत

कॅग रिपोर्ट्सनुसार, काही रेल्वेमंडळात हे ब्लॅंकेट्स सहा महिन्यांपासून धुतलेले नाहीत. त्यामुळे या समस्येवर तोडगा काढण्यासाठी एक नवीन पाऊल उचलण्यात आलेले आहे. या नवीन सुविधेच्याअंतर्गत एसी कोचमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आता ब्लॅंकेट्स महिन्यातून दोनदा धुतले जातील. 

सध्या दोन महिन्यातून एकदा धुण्याचा नियम

सध्या ब्लॅंकेट्स दोन महिन्यातून एकदा धुण्याचा नियम आहे. त्याचबरोबर खूप जुने ब्लॅंकेट्स देखील प्रवाशांना दिले जाणार नाहीत. याशिवाय ट्रेनमधील जूने आणि घाणेरडे ब्लॅंकेट्स हळूहळू बदलण्याची योजना तयार करण्यात आली आहे. तसंच रेल्वे बोर्डाकडून आलेल्या आदेशानुसार, ट्रेनच्या एसी डब्ब्यात ऊबदार ब्लॅंकेट्सऐवजी चांगल्या प्रतीचे नायलॉनचे ब्लॅंकेट्स मिळतील. 

एका महिन्यात दोनदा धुतले जातील ब्लॅंकेट्स

रेल्वे आदेशानुसार, ब्लॅंकेट्स दोन महिन्यातून एकदा धुण्याऐवजी महिन्यातून दोनदा धुण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर ब्लॅंकेट्स ग्रीस, साबण किंवा इतर घटकांपासून मुक्त असतील, कडक असतील, याची खबरदारी घेण्यात येणार आहे.
४५० ग्रॅम नवीन ब्लॅंकेट्स ६०% ऊबदार आणि १०% नायलॉनपासून बनलेले असतील. रेल्वे बोर्डाने उच्च प्रतीच्या हलक्या ब्लॅंकेट्संना एसी डब्यासाठी हिरवा झेंडा दाखवला आहे. सध्या २.२ किलोग्रॅम वजन असलेले ब्लॅंकेट्स लहान आकाराचे आहेत आणि याचा ४ वर्ष प्रयोग करण्यात येईल.