नवी दिल्ली : कोरोना काळात भारतीय रेल्वेने अनेक नियम लागू केले होते. मात्र, आता कोरोना परिस्थिती सामान्य झाली आहे. अशावेळी भारतीय रेल्वेने कोरोना काळातील सर्व नियम एक एक करून मागे घेत आहे.
देशातील लाखो लोक भारतीय रेल्वेतून दररोज प्रवास करतात. प्रवाशांना आरामदायी प्रवास मिळावा यासाठी भारतीय रेल्वे सातत्याने प्रयत्न करत आहे. असे असतानाही प्रवाशांना रेल्वे तिकीट काढताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतच आहे.
अनेकदा रेल्वे तिकीट बुक करताना प्रवाशांना आपली माहिती भरण्यासाठी वेळ लागतो. यामुळे बर्याच वेळा कन्फर्म होणारे तिकीट वेटिंगमध्ये जाते. यावर रेल्वेने तोडगा शोधला आहे.
कोरोना काळात तिकीट बुकिंग करताना प्रवाशांना आपला गंतव्य पत्ता नोंद करणे आवश्यक होते. याचे कारण म्हणजे जर कुणी कोविड -19 पॉझिटिव्ह आढळला तर त्याला शोधता येईल. परंतु, आता परिस्थिती बदलली आहे. त्यामुळे भारतीय रेल्वेने तिकीट बुकिंगचे नियम बदलले आहेत.
आता देशात आणि जगात कोरोनाची प्रकरणे कमी होत असताना भारतीय रेल्वेने तिकीट बुकिंगमध्ये गंतव्यस्थानाचा पत्ता टाकण्याचा नियम काढून टाकला आहे. या संदर्भात माहिती देताना रेल्वे मंत्रालयाने 'जे लोक IRCTC वेबसाइट आणि अॅपद्वारे तिकीट बुक करतात त्यांना जाण्याचा पत्ता प्रविष्ट करणे आवश्यक नाही' असे म्हटले आहे.
रेल्वे मंत्रालयाने असे आदेश जारी केले असून यात रेल्वे तिकीट बुकिंगवेळी गंतव्य पत्त्याची माहिती मागू नये, असे म्हटले आहे.