रेल्वेचा नवी योजना, पाण्याच्या रिकाम्या बाटलीवर कॅशबॅक!

भारतीय रेल्वे प्लास्टिकपासून वाढणाऱ्या प्रदुषणाला आळा घालण्यासाठी नवनवीन योजना घेऊन येत आहे.

Updated: Jun 7, 2018, 04:42 PM IST
रेल्वेचा नवी योजना, पाण्याच्या रिकाम्या बाटलीवर कॅशबॅक! title=

मुंबई : भारतीय रेल्वे प्लास्टिकपासून वाढणाऱ्या प्रदुषणाला आळा घालण्यासाठी नवनवीन योजना घेऊन येत आहे. जागतिक पर्यावरण दिवसानिमित्त रेल्वेनं काही शताब्दी आणि राजधानी एक्स्प्रेसमध्ये प्लास्टिकविरहित इको फ्रेंडली प्लेटमध्ये भोजन द्यायला सुरुवात केली. दिल्लीहून सुटणाऱ्या 8 शताब्दी आणि राजधानी एक्स्प्रेसमध्ये या योजनेची सुरुवात झाली. यानंतर आता प्लास्टिक बाटल्यांवर कॅशबॅक द्यायची योजना रेल्वेनं आणली आहे. या योजनेची सुरुवात बडोदा रेल्वे स्टेशनवरून झाली आहे. बडोदा रेल्वे स्टेशनवर बॉटल क्रशर मशीन लावण्यात आलं आहे. रेल्वे स्टेशन प्लास्टिकमुक्त करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे. बॉटल क्रशरमध्ये प्लास्टिकची पाण्याची बाटली टाकली तर 5 रुपयांचा कॅशबॅक मिळणार आहे. बडोदा स्टेशनवर हा प्रयोग यशस्वी झाला तर देशभरातल्या अन्य स्टेशनवरही अशाचप्रकारची मशीन लावण्यात येणार आहेत.

असा मिळेल कॅशबॅक

बॉटल क्रशरमध्ये पाण्याची रिकामी बाटली टाकल्यानंतर मशीनमध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर द्यावा लागेल. यानंतर बाटली क्रश होईल आणि तुम्हाला 5 रुपयांचं कॅशबॅक मिळेल. ही कॅशबॅक तुमच्या पेटीएम वॉलेटमध्ये जमा होईल.

पियुष गोयल यांचं ट्विट

आयआरसीटीसी आता उसाच्या मळीपासून बनवलेल्या सुरी, काटा चमचा आणि कंटेनरचा वापर करेल, असं ट्विट रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी केलं.