नवी दिल्ली: एप्रिल ते जून या तिमाहीमध्ये देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात विक्रमी वाढ झाली आहे. गेल्या दोन वर्षांतल्या तिमाही वाढीचे आकडे मोडीत काढत भारताने ८.२ टक्के इतका जीडीपी नोंदवलाय.
प्रामुख्याने औद्योगिक उत्पादन आणि शेतीमध्ये झालेल्या वाढीचा जीडीपीला मोठा फायदा झाला. या आकडेवारीमुळे सर्वाधिक वेगाने वाढणारी मोठी अर्थव्यवस्था हा आपला किताबही भारताने कायम ठेवला.
याच तिमाहीमध्ये चीनचा विकासदर ६.७ टक्के राहिलाय. नोटबंदी आणि राफेल खरेदीवरून विरोधक रान उठवत असताना आलेली ही आकडेवारी केंद्र सरकारला मोठा दिलासा देणारी आहे. यामुळे आता यंदाच्या आर्थिक वर्षात ७.५ टक्के विकासदर गाठण्याची शक्यता वाढल्याचे अर्थमंत्रालयाने सांगितले.
२०१७ मध्ये जीडीपी ७.७ टक्क्यांवर आला होता. नोटाबंदीमुळे विकासदर घसरला आणि अर्थव्यवस्था कोलमडली अशी टीका होत असतानाच विकास दर ८.२ टक्क्यांवर जाऊन पोहचला आहे. मागील १८ तिमाहीतील ही सर्वोच्च कामगिरी ठरली आहे. एप्रिल ते जून या तिमाहीत देशाच्या अर्थव्यवस्थेला अच्छे दिन आले आहेत.