देशातील स्वच्छ शहरांची यादी : इंदौर अव्वल स्थानी; नवी मुंबईचा तिसरा क्रमांक

केंद्रीय शहरी विकास मंत्रालयाच्या वतीने हरदीपसिंह पुरी यांनी केली घोषणा

Updated: Aug 20, 2020, 03:06 PM IST
देशातील स्वच्छ शहरांची यादी : इंदौर अव्वल स्थानी; नवी मुंबईचा तिसरा क्रमांक title=

मुंबई : केंद्र सरकारतर्फे राबविण्यात आलेल्या 'स्वच्छ भारत अभियान २०२०' चा निकाल जाहीर झाला आहे. या उपक्रमात इंदौर शहराने देशातील स्वच्छ शहरांच्या यादीत पहिला क्रमांक पटकावला आहे. महत्वाची बाब म्हणजे इंदौरने सलग चौथ्या वर्षी अव्वल स्थान मिळवलं आहे. तर दुसऱ्या क्रमांकवर सुरत असून तिसऱ्या क्रमांकावर नवी मुंबई हे शहर आहे.  

नाशिक महापालिका यंदा ११ व्या क्रमांकार आहे. केंद्रीय शहरी विकास मंत्रालयाच्या वतीने हरदीपसिंह पुरी यांनी आज घोषणा केली आहे. या सर्वेक्षणाचे यंदाचे पाचवे वर्ष आहे. नवी मुंबईने 'स्वच्छ सर्वेक्षण २०१९' मध्ये राज्यात प्रथम तर देशात सातवा क्रमांक मिळवला आहे. मात्र यंदा नवी मुंबईने टॉप टेनमध्ये नंबर पटकावला आहे. नवी मुंबईसह नाशिक ११ व्या क्रमांकावर, ठाणे १४ व्या क्रमांकावर, पुणे १५ व्या क्रमांकावर, नागपूर १८ व्या क्रमांकावर, कल्याण-डोंबिवली २२ व्या क्रमांकावर, पिंपरी चिंचवडने २४ वा क्रमांक पटकावला आहे. तर औरंगाबाद २६, वसई-विरार ३२ आणि मुंबई ३५ व्या क्रमांकावर आहे.

‘स्वच्छ सर्वेक्षण अभियान २०२०’ हे २८ दिवसांमध्ये पूर्ण करण्यात आलं होतं. स्वच्छता ऍपवरुन १ कोटी ७० लाख लोकांनी अभियानासाठी नोंदणी केली होती. सोशल मीडियावरुन ११ कोटी लोकांनी अभियानाला प्रतिसाद दिला. तर साडे पाच लाखांहून अधिक स्वच्छता कामगारांना सामाजिक कल्याणकारी योजनांशी जोडण्यात आलं.