इंदोर : पश्चिम बंगालची ३० वर्षीय जोइता मंडल हिनं इतिहास घडवलाय. जोइता देशाची पहिली 'किन्नर' (ट्रान्सजेन्डर) न्यायाधीश बनलीय.
एक वृद्धाश्रम चालवण्यासोबतच जोइता रेड लाईट भागात राहणाऱ्या कुटुंबाची आयुष्य बदलण्यासाठी धडपडतेय. तिचा हा समर्पण भाव डोळ्यांसमोर ठेवत पश्चिम बंगाल सरकारनं जुलै २०१७ मध्ये तिचा सन्मान करत तिला लोक न्यायालय न्यायाधीश म्हणून नेमणूक केलीय. त्यामुळे ती देशाची पहिली किन्नर न्यायाधीश बनलीय.
सर्व जण टर उडवतात त्यामुळे तीनं महाविद्यालयीन शिक्षण मध्येच सोडलं. त्यानंतर २००९ मध्ये तीनं आपल्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. जवळ एक रुपयाही नसताना तिला बस स्थानक आणि रेल्वे स्टेशन्सवरही अनेक रात्र काढाव्या लागल्यात. समाजाकडून उपेक्षा पदरात पडल्यानंतर तिनं किन्नरांच्या वस्तीत जाण्याचा निर्णय घेतला... आणि इतर किन्नर जे करतात तीच नाचण्या-गाण्याची कामं ती करू लागली. त्यानंतरही तिनं आपलं शिक्षण सुरू ठेवलं.
२०१० मध्ये दिनाजपूरमध्ये किन्नरांच्या हक्कासाठी काम करणारी एक संस्था स्थापन केली. त्यानंतर वृद्धांसाठी एका वृद्धाश्रमाचीही स्थापना केली. रेड लाईट भागात राहणाऱ्या महिलांना आणि त्यांच्या मुलांना रेशन कार्ड, आधार कार्ड बनवण्यासाठी आणि शिक्षणासाठी प्रोत्साहन दिलं.
१४ एप्रिल २०१४ रोजी सर्वोच्च न्यायालयानं किन्नरांनाही समाजाचा एक भाग असल्याचं मान्य करत महिला, पुरुष सोबतच तिसरं 'लिंग' म्हणून मान्यता दिली. या निर्णयानं अनेक किन्नरांना लढण्याची, स्वत:च्या हक्कासाठी लढण्याची ताकद दिली, असं जोइतानं म्हटलंय.